मध्यमवर्गीय, गोरगरिबांना फसवून कोटय़वधींचा गंडा घालणाऱ्या भाऊसाहेब चव्हाण यासह केबीसी मल्ट्रिटेड कंपनीशी संबंधित सर्व संशयितांच्या मालमत्तेचा लिलाव करून काही प्रमाणात गुंतवणूकदारांना मदत करण्याची मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
केबीसीमध्ये फसवणूक झालेले अनेक गुंतवणूकदार व दलालांची मन:स्थिती बिघडली असून काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. केबीसीच्या महाराष्ट्रातील सर्व मालमत्तेचा तसेच भाऊसाहेब चव्हाण यासह त्यांच्या नातेवाईकांच्या कंपनीच्या नावे वेगवेगळ्या जिल्ह्य़ात असणाऱ्या बँकेतील रक्कम एकत्रित करून ज्या गुंतवणूकदारांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे. त्यांना किमान प्राथमिक स्वरूपात काही रक्कम देण्याची मागणी संघटनेने केली आहे. चव्हाण व त्याला मदत करणाऱ्या सर्वाविरोधात मोक्काअंतर्गत कार्यवाही करण्याचा आग्रह निवेदनात धरण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्य़ात यापूर्वीही अशा प्रकारच्या विविध संस्थांच्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांची फसवणूक झाली आहे, परंतु प्रकरण न्यायालयात गेल्यावर संबंधितांना जामीन मिळत असल्याने मागील सर्व प्रकरणांमध्ये अडकलेले पैसे अद्याप सभासदांना मिळाले नसल्याची वस्तुस्थिती निवेदनात मांडण्यात
आली आहे.
केबीसी प्रकरणाची गत अशी होऊ नये यासाठी या प्रकरणाशी संबंधित सर्वाच्या मालमत्तेचा त्वरित लिलाव करण्याची गरज आहे. असे न केल्यास फसवणूक झालेले गुंतवणूकदार आणि दलाल यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढू शकते. सभासदांकडून दलालांवर हल्लेदेखील होऊ शकतात, अशी भीतीही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनावर अविनाश आहेर, चंद्रकांत बोंबले, कविता गायकवाड, अंजली वैद्य आदींची स्वाक्षरी आहे.