तालुक्यासाठी ठिबक सिंचन योजनेंतर्गत २२ लाख ७८ रुपयाचा निधी प्राप्त असून ३० नोव्हेंबरपर्यत हा निधी वितरित न झाल्यास परत जाईल, अशी माहिती तालुका कृषि अधिकारी सी. जे. पाडवी यांनी दिली. जळगाव जिल्ह्य़ासाठी एकूण चार कोटी रुपयाचा निधीचे वितरण फक्त १५ दिवसाच्या आत करण्याचा आदेश असल्याने कोणत्या तालुका कृषि अधिकाऱ्यांकडून किती शेतकऱ्यांना अनुदान मिळेल, याकडे संपूर्ण कृषि विभागाचे लक्ष लागून आहे.
तालुक्यात अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी तीन लाख ६५ हजार, अनुसूचित जमातीसाठी एक लाख ८२ हजार, अल्पभूधारकांसाठी सात लाख ५२ हजार, महिला व इतर शेतकऱ्यांसाठी नऊ लाख ८० हजार रुपये, याप्रमाणे एकूण २२ लाख ७८ हजार रुपयाचा निधी ३० नोव्हेंबपर्यंत विक्रेत्यांसह शेतकऱ्यांमार्फत आलेल्या प्रस्तावानुसार वितरित करण्याचे आदेश शासनाचे आहेत. निधी वितरित करण्याचा कालावधी अत्यंत कमी असल्याने जिल्ह्य़ातील इतर तालुका कृषी अधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे. ठिबक अनुदान शेतकऱ्यांच्या वर्गवारीनुसार तसेच कोरडवाहू, बागायत शेतजमीनीनुसार केंद्र सरकार ४५ टक्के, राज्य सरकार १० टक्के असा सयुक्तरित्या निधी एक हेक्टरपासून पाच हेक्टपर्यंत देण्यात येईल. साधारणपणे एका हेक्टरला ३५ हजार रुपये अनुदान ठिबक साहित्यासाठी मिळणार आहे.
या योजनेचा लाभ एक एप्रिल ते ३० नोव्हेंबर दरम्यानचा आहे. तालुका कृषी अधिकारी, शेतकरी व ठिकक विक्रेता, डिलर यांना फक्त आठ दिवसाचा कालावधी प्रत्यक्ष प्रस्ताव तयार करण्यासाठी मिळाला आहे.