एखादा विद्यार्थी परीक्षेत कॉपी करताना पकडला गेला व त्याने क्षमापत्र दिल्यास विद्यापीठ त्याला मन मोठे करून माफ करते का? जर माफीनामा देऊनही कॉपी करणारा विद्यार्थी शिक्षेस पात्र ठरत असेल तर तोच न्याय गुन्हा करणाऱ्या महाविद्यालयाला का नाही, असा सवाल करीत नवी मुंबईतील ‘भारतीय जनता पक्षा’च्या नेत्यांनी फादर अ‍ॅग्नेल या शिक्षणसंस्थेविरोधात कडक कारवाईची मागणी मुंबई विद्यापीठ आणि शिक्षणाधिकाऱ्याकडे केली आहे.
व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली राजकीय नेत्यांबद्दल विशेषत: अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी आदी हिंदुत्त्ववादी नेत्यांची प्रतिमा मलीन करणारे लिखाण करणारे पुस्तक विद्यार्थ्यांमध्ये वाटल्याबद्दल नवी मुंबईतील भाजपच्या नेत्यांनी या तक्रारी ऑक्टोबर, २०१३मध्ये केल्या होत्या. २०१३मध्ये ‘यू कॅन मेक अ डिफरन्स’ या अलफान्सो अ‍ॅलेंजीकल लिखित पुस्तकाच्या प्रती संस्थेने बारावी, पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षांला असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत वाटल्या होत्या. ‘या पुस्तकात हिंदू हे अतिरेकी असतात, ठाकरे, मोदी, प्रवीण तोगडिया हे चिथावणीखोर हिंदू नेते आहेत’, अशा अर्थाचे लिखाण आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयीही पुस्तकात अवमानजनक नोंद असून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा मात्र ‘कर्तबगार स्त्री’ म्हणून गौरव करण्यात आला आहे. हे लिखाण पाहता व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनात राजकीय व धार्मिक विद्वेषाचे विष पसरविले जात आहे,’ असा आक्षेप भाजप नेत्यांनी लेखी तक्रार करून विद्यापीठ आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे नोंदविला होता. या गुन्ह्य़ाकरिता संस्थेवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली होती.
त्यावर संबंधित संस्थेने या प्रकरणी लेखी माफी मागितली असून ही पुस्तके मागे घेतल्याचे कळविले आहे, असे स्पष्ट करून विद्यापीठाच्या कुलसचिवांनी या वादाला पूर्णविराम दिल्याचे पत्राद्वारे कळविले. पण, हा विषय संस्थेच्या माफीनाम्यावर संपविण्यास भाजपचे नेते तयार नाही. शिक्षणसंस्था म्हणून महाविद्यालयाने अधिक जबाबदारीने वागायला नको का, असा सवाल ही तक्रार करणारे भाजपचे नवी मुंबई सरचिटणीस संतोष पाचलग यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना एक आणि संस्थेला वेगळा असा न्याय विद्यापीठ लावू शकत नाही. त्यामुळे, संबंधित संस्थेवर कडक दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अनवधानाने झाले
पुस्तकाच्या शीर्षकावरून आम्ही हे पुस्तक निवडले होते. पुस्तकातील मजकुराविषयी आम्ही अनभिज्ञ होतो. आमच्याकडून हे अनवधानाने झाले असून कुणाच्या भावना दुखविण्याचा आमचा हेतू नव्हता. पुस्तकातील मजकुराविषयी आम्हाला माहिती करून दिल्यानंतर संस्थेने माफीही मागितली असून पुस्तके विद्यार्थ्यांकडून परत घेतली आहेत. त्यामुळे, हा विषय आता संपविण्यात यावा, असे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.