शहरात अनेक गॅस वितरकांच्या कर्मचाऱ्यांकडून नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार ग्राहकांकडून होत असून अशा तक्रारींचे वितरकांनी निवारण करावे तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतीचे विलास देवळे यांनी केली आहे.
गॅस वितरक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांविरूध्द ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ग्राहकांना सिलिंडर देताना त्याचे व गॅसचे वजन करणे, सिलिंडरचे सील योग्य असल्याचे दाखविणे, गॅस गळती होत नसल्याचे दाखविणे हे गॅस वितरकांवर अनिवार्य असतानाही ही सेवा देण्याची टाळाटाळ केली जाते. इंदिरानगर परिसरात एका ठिकाणी दीड-दोन किलो गॅस यंत्राने काढून कमी वजनाचे सिलिंडर विकण्याचा प्रकार नाशिक पोलिसांनी उजेडात आणला. गॅस वितरकाचे प्रतिनिधी व त्यांच्या साथीदारांना रंगेहात पकडले. आता तरी जिल्हाधिकारी व त्यांच्या अधिपत्याखालील पुरवठा विभाग प्रशासनाने ग्राहक हितासाठी ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ व अत्यावश्यक सेवा कायदा यानुसार कारवाई करण्याची मागणी होत आहे. रिफील गॅस कमी वजनाचा विकणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधी, गॅस वितरक व त्याचे प्रतिनिधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, एचपी गॅस जिल्हा विक्री अधिकारी व गॅस वितारक यांनी आठवडय़ातून दोन दिवस गॅस एजन्सीत गॅस ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्याचे निवारण करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांचे नियम असूनही त्याचे पालन न केल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्राहकांनी यासंदर्भातील आपल्या तक्रारी ९४२२२६६१३३, ९४२१९१७३६४ या क्रमांकावर कराव्यात असे आवाहन विलास देवळे, अनिल नांदोडे यांनी केले आहे.