वाढते शहरीकरण, जीवनशैलीतील बदल व सदोष जलव्यवस्थापन यामुळे डासांच्या उत्पत्तीचा वेग वाढत आहे. शहरात डेंग्यूची तीव्रता वाढत असताना नागरिकांनी स्वत: खबरदारी घेणेही तितकेच गरजेचे आहे. आरोग्य विभाग तथा प्रशासन यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वयंस्फूर्तीने जलसाठय़ाची स्वच्छता राखण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले आहे. डेंग्यू म्हणजे काय, हा आजार कसा पसरतो, यावरील उपाययोजना त्यांनी सुचविल्या आहेत. डेंग्यूचा प्रादुर्भाव पाहता राज्य शासन आणि आरोग्य विभाग उपाययोजना करीत आहे. मात्र नागरिकांनी आपली नैतिक जबाबदारी म्हणून डेंग्यूचा फैलाव होऊ नये यासाठी परिसर स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रत्येक नागरिकाची जबाबदारी
महापालिका वा आरोग्य विभागाचे हे काम आहे असे वाटत असले तरी पाणीसाठय़ाची ठिकाणे नष्ट करणे हे आपल्या हातात आहे. याखेरीस डासांनी चावा घेऊ नये यासाठी डासविरोधी मलम अंगाला लावणे, मच्छरदाणीचा वापर करणे, अंगभर कपडे घालणे आदी उपाय नक्कीच करता येतील. शिवाय वैयक्तिक, घराभोवतालची स्वच्छता ठेवल्यास डेंग्यू व अस्वच्छतेमुळे होणारे इतर अनेक आजार आपण टाळू शकतो.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Congress accuses the government that more and more families are in debt
अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट! अधिकाधिक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्यचा काँग्रेसचा सरकारवर आरोप
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!

डेंग्यू म्हणजे काय ?
डेंग्यू एका विषाणूमुळे होणारा आजार आहे. या विषाणूंचे चार उपप्रकार आहेत. एडीस ईजिप्ती व एडीस अलबोपिक्टस या डासाच्या चाव्यामुळे हा रोग पसरतो. डेंग्यू आपोआप बरा होणारा रोग असला तरी रोगाची अभिव्यक्ती सामान्य डेंग्यू ताप, डेंग्यू रक्तस्रावी ताप, शॉकसह डेंग्यू रक्तस्रावी ताप या तीन प्रकारे होऊ शकतो.

डेंग्यूचे प्रमाण का वाढते?
वाढत्या शहरीकरणासह जीवनशैलीतील बदल व सदोष जलव्यवस्थापनामुळे डासांच्या उत्पत्तीचा वेग वाढत आहे.
दर वर्षी पावसाळा संपला की, डेंग्यूच्या प्रमाणात वाढ होते व साथी येतात. देशातील ३१ राज्यांत डेंग्यूचे रुग्ण नियमितपणे आढळून येतात. डेंग्यूमुळे रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे
प्रमाण २०११ मध्ये ०.६५ टक्केहोते. २०१३ मध्ये ते वाढले आहे. सप्टेंबर २०१४ पर्यंत २९९७ व्यक्तींना डेंग्यूची लागण झाली.

नियंत्रण कसे करता येईल
डेंग्यूचे डासांच्या अंगावर वाघासारखे पट्टे असल्याने त्याला ‘टायगर मॉस्किटो’ म्हणतात. घर वा घराभोवतीच्या साठलेल्या पाण्यात या डासांची पैदास होते. फुटके डबे, बाटल्या, फेकलेल्या बादल्या, फ्लॉवरपॉट, नारळाची करवंटी, मातीची भांडी, झाडातील पोकळ्या, पडलेले टायर अशा अनेक ठिकाणी पाणी जमा होते. त्यात हा डास अंडी घालतो. डासाची मादी सहसा दिवसा चावे घेते. डास जास्त उंच उडू शकत नसल्याने त्याचे निर्दालन करणे सोयीचे आहे. अळ्या मारणारी व प्रौढ डासांना मारणारी कीटकनाशके फवारूनही डासांचा नायनाट करता येईल.

डेंग्यूची साथ का येते?
विषाणूचा प्रकार, डासांची संख्या व त्यांची वर्तणूक, रोगबाधित होण्याची व्यक्तीमधील संभाव्यता व पूर्वी डेंग्यू विषाणू संसर्ग न झालेले लोकसमूह आदी घटक यासाठी कारणीभूत
असतात.

कोण लवकर बाधित होऊ शकते
डेंग्यू साधा आजार असला तरी तो गुंतागुंतीचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बालक, वृद्ध, लठ्ठ व्यक्ती, गरोदर स्त्रिया, जठर वा आतडय़ातील व्रणाचे रुग्ण, मासिक पाळी
चालू असणाऱ्या स्त्रिया, थॅलॅसिमियासारख्या रोगांचे रुग्ण, जन्मत: हृदय विकाराचे
रुग्ण, स्टिरॉईड औषधी घेणारे रुग्ण तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा आदी जुनाट आजारांचे रुग्ण लवकर बाधित होण्याची शक्यता आहे.

डेंग्यूची लक्षणे
बहुतांश लोकांमध्ये डेंग्यू संसर्गामुळे ताप हे लक्षण दिसून येते. शिशू, मुले व पहिल्यांदाच डेंग्यूची लागण होणाऱ्या प्रौढांमध्ये इतर विषाणुजन्य रोगात येणाऱ्या तापाप्रमाणेच ताप येतो. रुग्ण बरा होतानाच्या काळात किंवा तापासोबत अंगावर पुरळ येऊ शकते. यासोबतच श्वसन संस्था व पचनसंस्था यांच्याशी संबंधित रोग लक्षणे आढळून येतात. तसेच सामान्यपणे थंडी वाजून ताप येणे, तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी हे लक्षणे दिसतात. नंतरच्या २४ तासांत डोळे दुखायला लागतात आणि त्या व्यक्तीला उजेडही सहन होत नाही. खूप थकवा येणे, भूक न लागणे, बद्धकोष्ठ, पोटात कळ येणे, जांघेत ओढल्यासारखे दुखणे, घसा खवखवणे, नैराश्य येणे आदी लक्षणे असतात. साधारणत: पाच दिवस हा ताप राहतो. नंतर रुग्ण पूर्णपणे बरा होतो. मात्र यात डेंग्यू रक्तस्रावी ताप गंभीर प्रकार आहे. पहिल्या टप्प्यातील तापाप्रमाणे याची लक्षणे असतात. मात्र ताप ४०-४१ डिग्रीपर्यंत वाढतो. बालकांमध्ये यामुळे तापात झटके येऊ शकतात. या प्रकारात केशनलिकांमधून रक्तद्रव बाहेर पडून गुंतागुंत निर्माण होऊ शकते. या प्रकारच्या डेंग्यूमुळे रुग्ण मृत्युमुखी पडतात. तिसऱ्या प्रकारात ताप, रक्तस्राव तसेच शॉक या तिन्ही बाबी आढळून येतात. या तीव्र डेंग्यूमध्ये केशवाहिन्यांतून रक्त द्रवाची गळती
झाल्याने शॉकची लक्षणे दिसून येतात. श्वसनाला त्रास होतो. गंभीर रक्तस्राव किंवा विविध इंद्रिये निकामी होतात.

उपचार
डेंग्यू सर्वसाधारण आजार असून क्वचितप्रसंगी गंभीर रूप धारण करू शकतो. डेंग्यूवरील उपचार लक्षणानुरूप आहेत. विषाणू मारण्यासाठी प्रभावी औषधे नाहीत, तशी लसही नाही. डेंग्यू जसा कोणालाही होऊ शकतो तसेच त्याला प्रतिबंधही करता येईल.