शहरासह जिल्ह्य़ात डेंग्यू आणि विषाणूजन्य तापाच्या प्रकोपाने भीतीचे वातावरण पसरले असून गेल्या चार दिवसांत शहर आणि परिसरात डेंग्यूमुळे एका चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती आरोग्य यंत्रणांपर्यंत पोहोचत नसल्याने रुग्णसंख्येचा अंदाज काढणे कठीण होऊन बसले आहे.
 गेल्या मंगळवारी मंगला प्रभुदास धोटे (४५) आणि उत्तम संतुराम शेरेकर (७०, दोघेही रा. मृगेंद्र मठ, अमरावती) यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. या दोघांवरही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, गुरुवारी बडनेरानजीकच्या बेलोरा येथील सृष्टी सुधीर मोखडे (वय ३ वष्रे) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्य़ात हिवताप आणि विषाणूजन्य आजाराचे थमान आहे. हजारो रुग्ण सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आरोग्य यंत्रणा मात्र अजूनही रक्तजल नमुन्यांच्या अहवालाच्याच प्रतीक्षेत आहे. डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूंची अजूनही आरोग्य यंत्रणेकडे नोंद झालेली नाही.
मंगला धोटे यांना गेल्या २० सप्टेंबरला ताप आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी घराशेजारी असलेल्या एका रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. २४ सप्टेंबरला त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना तात्काळ डॉ. यादगिरे यांच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांच्या रक्तनमुन्यांची तपासणी करण्यात आली, तेव्हा त्यांच्या रक्तात डेंग्यूची लक्षणे आढळून आली. मंगलावर उपचार सुरू होते, पण मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. मृगेंद्र मठ परिसरातच राहणारे उत्तम शेरेकर हे महिनाभरापूर्वी तापाने आजारी होते, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. गेल्या सोमवारी त्यांना पुन्हा ताप आला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
बेलोरा येथील ३ वर्षीय चिमुकलीवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, पण तिचाही मृत्यू झाला. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असलेल्या अनेक रुग्णांच्या रक्तनमुन्यांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आली आहेत. त्यांचा एकत्रित अहवाल तयार झालेला नाही. शहरातील ‘पॅथॉलॉजी लॅब’च्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार डेंग्यूची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अलीकडे वाढली आहे. या संदर्भात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. लव्हाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीत व्यस्त होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सोनावणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये हे दौऱ्यावर असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. सहायक संचालक (हिवताप) यांच्या कार्यालयात तर सप्टेंबर महिन्याची संशयित डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी अद्याप तयार झालेली नव्हती. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्य़ांतील संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. अहवाल प्राप्त होईपर्यंत उशीर झालेला असतो.
जिल्ह्य़ात ऑगस्ट महिन्यात ४४ संशयित रुग्णांच्या रक्तनमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यात एकही रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ नव्हता. सप्टेंबर महिन्यातील स्थिती माहिती होऊ शकली नाही. सरकारी आरोग्य यंत्रणा त्यांच्या गतीने काम करीत असल्याने डेंग्यूच्या रुग्ण संख्येविषयी नेमकी माहिती मिळू शकली नसली तरी संपूर्ण जिल्ह्य़ात खासगी रुग्णालयांमधील गर्दीने विषाणूजन्य तापाच्या प्रकोपाची लक्षणे दाखवून दिली आहेत. उद्रेक झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्याची अपेक्षा यंत्रणाकडून केली जात आहे.