शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) पाच निवासी डॉक्टरांना ‘डेंग्यू’ झाल्याच्या माहितीने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सध्या मात्र एकही निवासी डॉक्टर डेंग्यूमुळे आजारी नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
यावर्षी डेंग्यूने शहरात थैमान घातले आहे. यावर्षी शहरात डेंग्यूने दोघांचा तर ग्रामीणमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून येत आहे. परंतु डेंग्यूने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या यापेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एडिस इजिप्ती या डासामुळे डेंग्यू हा आजार होतो. विशेष म्हणजे हा डास दिवसाच चावतो. साचलेल्या पाण्यात याची उत्पत्ती होते. शहरात सगळीकडे साचलेले पाणी, घाणीचे साम्राज्य यामुळे डेंग्यूची पैदास अधिक होत आहे. यावर आळा घालण्यास सरकारी यंत्रणा अयशस्वी ठरली आहे.
भारतातील सर्वात मोठे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेडिकलमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत प्रत्येक वॉर्डाचे नूतनीकरण करण्यात आले. रंगरंगोटी करण्यात आली. मेडिकलच्या इमारतीतील वऱ्हांडय़ांनाही टाईल्स लावण्यात आल्यात. परंतु या टाईल्सही नागरिकांनी थुंकून खराब करून ठेवल्यात. याशिवाय येथे येणारे रुग्णांचे नातेवाईक उरलेले अन्न मेडिकलच्या मोकळ्या परिसरात टाकून देतात. त्यामुळे मेडिकलच्या परिसरातही डासांची पैदास मोठय़ा संख्येने झाली आहे. वॉर्डात दाखल असलेल्या रुग्णांच्या शरीरावरही हे डास घोंगावत असतात. ज्या उपचारासाठी रुग्ण आला तो त्या आजारातून बरे होण्यापेक्षा डेंग्यूच्या भीतीनेच अधिक त्रस्त आहे. अशा स्थितीत येथे निवासी डॉक्टर्स चोवीस तास सेवा देत असतात. त्यामुळे उपचार घेणारे रुग्ण आणि उपचार करणारे डॉक्टर्स दोघेही मनुष्यच असल्याने डासांमुळे हैराण झाले आहे.
जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यात मेडिकलमधील पाच निवासी डॉक्टरांना डेंग्यू झाला. यातील तीन डॉक्टरांना तर चक्क उपचारासाठी दाखलही करण्यात आले होते. परंतु ही माहिती आता बाहेर पडली आहे. सध्या मेडिकलमध्ये कोणताही डॉक्टर डेंग्यूमुळे आजारी नाही अथवा दाखल करण्यात आला नसल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे.बी. हेडाऊ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. डेंग्यूमुळे रक्तातील प्लेटलेट कमी होते. त्यामुळे अशा रुग्णांना रक्त द्यावे लागते. वेळेवर उपचार झाले नाही तर रुग्ण दगावण्याची भीती अधिक असते. सध्या मेडिकल परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून डासांची निर्मिती होणार नाही, याकडे लक्ष ठेवण्यात येत आहे. एक महिन्यापूर्वी मेडिकलच्या परिसरातून जवळपास तीनशे टन कचरा बाहेर काढण्यात आला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.