गेली अनेक वर्षे ती अंध मंडळी रस्त्यावर रुमाल, खेळणी, यांत्रिक वस्तू विकून आपली उपजीविका करतात. त्यांना तसा कोणाचाच आधार नसल्यामुळे कुठे झोपडपट्टीत तर कोणाच्या आश्रयाने भाडय़ाच्या घरात गेली अनेक वर्षे राहात आहेत. दारिद्रय़ त्यांच्या पाचवीला पुजले असले तरी निर्दयी सरकारी यंत्रणा नियमांवर बोट ठेवून त्यांना रेशन कार्ड देत नव्हती. अखेर एक ‘मसिहा’ त्यांच्या आयुष्यात आला. त्याने या अंधांची फिर्याद उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन मांडली आणि जिल्हाधिकारीही सकारात्मक भूमिका घेत या अंधांना रेशन कार्ड देण्यासाठी पुढे सरसावले.
गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि दहिसर येथील सुमारे सातशेहून अंध व्यक्ती सरकारच्या आंधळ्या कारभाराशी गेली अनेक वर्षे लढत आहेत. मालवणी येथील ‘रिलीफ अ‍ॅण्ड वेल्फेअर असोसिएशन फॉर ब्लाइंड’ या संस्थेचे कलाम सिद्दिकी हे १९८४ पासून अंध व्यक्तींच्या सामाजिक हक्कासाठी लढत आहेत. लोकप्रतिनिधी, सरकारी ‘बाबू’ लोकांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत तर कधी न्यायालयात लढा देत आहेत. अंध असूनही स्वत:च्या पायावर जिद्दीने उभ्या असलेल्या अंधांची मागणी काय तर रेशन कार्डवर मिळणारे धान्य त्यांनाही देण्यात यावे. दुर्दैवाने यातील अनेक अंधांना स्वत:चा हक्काचा निवारा नसल्यामुळे तसेच ते दारिद्रय़ रेषेखाली राहत असल्याचे पुरावे देऊ शकत नसल्याने त्यांना रेशन कार्ड दिले जात नव्हते. राहण्याचा ठिकाणा नाही की व्यवसायाच्या ठिकाणाचा पत्ता नाही अशा कारणांमुळे बधिर असलेली सरकारी यंत्रणेतील कोणीही या अंधांकडे कोणीच डोळसपणे पाहायला तयार नव्हता. एक दिवस कलाम सिद्दिकी यांनी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे कार्यालय गाठले. शेट्टी यांनी त्यांची व्यथा समजावून घेऊन सोमवारी थेट उपनगर जिल्हाधिकारी शेखर चेन्ने यांच्याकडे बैठक आयोजित केली. जिल्हाधिकारी चेन्ने यांनीही शेट्टी यांच्याकडून विषय समजावून घेतला, एवढेच नव्हे तर शिधावाटप विभागासह संबंधित अधिकाऱ्यांनाही बोलावून घेतले. या बैठकीत या अंध व्यक्तींना तात्काळ रेशन कार्ड देण्याची भूमिका घेऊन तसे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याबाबत कलाम सिद्दिकी म्हणाले, आमच्यासाठी हे स्वप्नच आहे. एखादा लोकप्रतिनिधी एवढय़ा आपुलकीने स्वत: येतो, आमची बाजू मांडतो आणि अधिकारीही साथ देऊन आमचा प्रश्न सोडवतात ‘तेव्हा देव कोठे तरी आहे’, हे जाणवते. अंध लोकांच्या जगण्याला एक खासदार म्हणून मला न्याय देता आला हे मी माझे भाग्य समजतो, असे गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.