मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीचे हिंसक पडसाद बुधवारी कोल्हापुरात उमटले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या  कार्यालयास लक्ष्य करीत प्रचंड नासधूस केली. प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रतिमेचे व मनसेच्या झेंडय़ाचे दहन केले. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात परस्परांविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून सायंकाळी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले होते.    शहरातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. दुचाकीवरून आलेल्या कार्यकर्त्यांच्या गटाने राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसून मोडतोड सुरू केली. राज ठाकरे यांच्या घोषणा देत आलेल्या कार्यकर्त्यांचा आक्रमक आवेग पाहून राष्ट्रवादीच्या कार्यालयातील कार्यकर्ते तेथून पळून गेले. त्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात जोरदार दगडफेक केली. त्यामध्ये कार्यालयातील काचा फुटून तेथे खच पडला होता. खुच्र्या, टेबल, टीव्ही यांची नासधूस करण्यात आली. सुमारे १५ ते २० मिनिटे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून हल्लाबोल सुरू होता.    राष्ट्रवादी कार्यालयावर हल्ला झाल्याची माहिती समजल्यानंतर जिल्हाध्यक्ष आर.के.पोवार, महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, युवक अध्यक्ष आदिल फरास, नगरसेवक रमेश पोवार, पद्मा तिवले यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने जमले. त्यांनी मनसेला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी मनसेच्या कार्यालयाचा शोध घेण्यास सुरूवात केली. पण त्यांना ते कार्यालय नक्की कोठे आहे हे समजू शकले नाही. मिरजकर तिकटी येथून ते जात असतांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नुकत्याच झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेचे पोस्टर व पक्षाचे झेंडे गोळा केले व त्याचे शंखध्वनी करीत दहन केले.
दरम्यान, राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत केडगे व सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट देऊन हल्ल्याची माहिती घेतली. राजवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा परस्परांविरोधी फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी दोंन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली होती.
सांगलीतही पोस्टर जाळले
सांगली येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोस्टर जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करीत हा प्रयत्न हाणून पाडला. याप्रकरणी पोलिसांनी पंधरा जणांना अटक करून नंतर सुटका केली.
 दोन दिवसांपूर्वी सांगली येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केले होते. त्याला बुधवारी मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले. राजवाडा चौकातील मनसेच्या कार्यालयात दुपारी सुमारे ५० कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनाच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. घोषणाबाजी सुरू असतांनाच अजित पवार यांचे पोस्टर जाळण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी हजर असलेल्या शहर पोलिसांनी मध्यस्थी करत पोस्टर हिसकावून घेत ते जाळण्याचा प्रयत्न हाणून पाडला. याप्रकरणी अमर पाडळकर, युवा अध्यक्ष अजित पटवर्धन, शहराध्यक्ष विजय मोरे,सुनिता इनामदार यांच्यासह पंधरा जणांना अटक करण्यात आली होती.