चामडय़ाच्या पर्सेस, लॅपटॉपच्या बॅग्ज, दिवाळीत विकल्या जाणाऱ्या लाखो रंगीबेरंगी पणत्या नाही तर आकाशकंदील यांची निर्मिती मोठय़ा प्रमाणावर धारावीत होते हे कित्येक मुंबईकरांना माहिती आहे. धारावीतील गल्लीबोळात बनणाऱ्या याच वस्तू अनेक दुकानांमधून ‘ब्रॅण्डेड’ म्हणून अवाच्या सवा किमतीला विकल्या जातात. मात्र, या किमतीतून मिळणारा पैसा धड या वस्तू बनवणाऱ्या धारावीकरांच्या खिशातही जात नाही आणि सर्वसामान्यांना जी चांगली वस्तू खुद्द धारावी मार्केटमध्ये स्वस्त किमतीत मिळाली असती तीच ब्रॅण्डेड स्टोअर्समध्ये जाऊन मोठय़ा किमतीला विकत घ्यावी लागते. आता या समस्येवर धारावीकरांना उत्तर सापडले असून हे धारावी मार्केटच मॉलमध्ये विक्री करताना दिसणार आहे.
धारावीत विविध प्रकारच्या वस्तू बनवणाऱ्या २०० कुशल कारागिरांना एकाच ब्रॅण्डखाली एकत्र आणत मेघा गुप्ता यांनी ६६६.ऊँं१ं५्रें‘ी३.ूे हे ऑनलाइन स्टोअर सुरू केले होते. धारावीतील कारागिरांना आपल्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता याव्यात हा त्यामागचा उद्देश होता, असे मेघा गुप्ता यांनी सांगितले. याचदरम्यान, मालाडच्या इनऑर्बिट मॉलच्या वतीने महिला उद्योजकांसाठी ‘पिंक पॉवर’ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत मेघा विजेत्या ठरल्या आणि आता त्यांच्या ऑनलाइन धारावी मार्के टला मॉलमध्ये रिटेलसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. धारावीतील कारागिरांना त्यांनी बनवलेल्या वस्तूंची योग्य ती किंमत मिळावी या एकाच विचाराने गेल्या वर्षी ऑनलाइन स्टोअर सुरू करण्यात आले होते. आत्तापर्यंत ऑनलाइन मार्केटमुळे कारागिरांचे उत्पन्न आधीच २० टक्क्यांनी वाढले आहे. पण, आता मॉलमध्येही जागा उपलब्ध झाल्यामुळे आमच्या ग्राहकांना प्रत्यक्ष इथे येऊन वस्तू पाहून त्या खरेदी करण्याचाही पर्याय उपलब्ध होईल, असे मेघा गुप्ता यांनी सांगितले.
सध्या इथे पर्सेस, बॅग्ज, विविध सजावटीच्या वस्तू, कलात्मक शिल्प अशा गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आपल्या वस्तू नेमक्या कोणत्या प्रकारच्या ग्राहकाच्या हातात पोहोचतात, याची काहीच कल्पना आम्हाला नव्हती, असे या मार्के टमध्ये सहभागी असलेले कारागीर मोहम्मद रफीक यांनी सांगितले. आत्तापर्यंत आम्ही मार्केटमधील अडत्यांना आमचा माल विकत होतो.
मॉलमध्ये प्रत्यक्ष ग्राहकांना या वस्तू विकताना आम्हाला त्याची चांगली किंमत मिळेल आणि मॉलमध्ये उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपेक्षा या वस्तू नक्कीच स्वस्त असतील, असे सांगणाऱ्या रफीक यांच्या मते धारावी मार्केट मॉलमध्ये आल्याने कारागिरांना आणखी एका अर्थाने फायदा होईल. धारावीतील वस्तू आणि त्या बनवणाऱ्या कारागिरांना एक ब्रॅण्ड म्हणून स्वत:ची ओळख मिळणे आवश्यक होते.
मॉलमध्ये हे मार्के ट उभे राहिल्याने धारावी एक ब्रॅण्ड म्हणून समोर येईल. त्यामुळे आणखी कु शल कारागिरांना या ब्रॅण्खाली एकत्र आणणे शक्य होईल. त्याचे परिणाम चांगल्या अर्थाने आमच्या व्यवसायावर होतील, अशी आशा रफीक यांनी व्यक्त केली.