खुल्या जागी कपडे धुतले आणि सुकवले जातात, अशी जगातील बहुधा सर्वात मोठी जागा असलेल्या धोबीघाटाच्या शेजारी काही दिवसांनी उत्तुंग इमारती उभ्या राहतील अशी चिन्हे आहेत. यामुळे मुंबईतील ‘धोबीघाट’ नावाला असलेली विशिष्ट ओळख पुसली जाणार आहे. या भागाच्या पुनर्विकासाबाबत येथील धोबी रहिवाशांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला वाद निवळला असून, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए) येथील झोपडय़ांचा दक्षिण मुंबईतील मोक्याच्या जागेवर पुनर्विकास करण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यास तयार झाले आहे. या संदर्भात ओंकार रिअल्टर्स यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे एसआरएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
महालक्ष्मी रेसकोर्स आणि त्याच्या पलीकडे अरबी समुद्र यांच्या सान्निध्यात असलेला धोबीघाट हा भाग म्हणजे जमिनीची वानवा असलेल्या मुंबापुरीतील मोक्याची जागा आहे. इंग्रज आणि सुखवस्तू पारशी यांच्या सेवेकरता ब्रिटिश आमदनीने निर्माण केलेल्या या जागेवर धुण्याचे ७३१ दगड (फ्लॉगिंग स्टोन्स) आहेत. या जागेलत असलेल्या २८ हजार ४५५ चौरस मीटर एवढी मोकळी जागा पूर्वी कपडे वाळत घालण्यासाठी वापरली जाई. गेल्या तीन दशकात या जागेवर अतिक्रमणे होत गेली आणि या जागेचे रूपांतर १५०० हून अधिक कुटुंबांना निवारा देणारी झोपडपट्टी आकाराला झाली. याच जागेवरील झोपडपट्टीधारकांना राहण्यासाठी किमान २० मजल्यांइतक्या उंचीचे टॉवर्स बांधले जाणार आहेत. याच्या मोबदल्यात विकासकाला उरलेल्या जागेवर ३ चटई क्षेत्रफळ निर्देशांकासह (एफएसाय) जागेचा व्यावसायिक वापर करण्याची परवानगी मिळणार आहे.
हा प्रस्ताव प्रत्यक्षात येण्यासाठी नियमानुसार ओंकार रिअल्टर्सला किमान ७० टक्के रहिवाशांची परवानगी घ्यावी लागेल. एसआरएच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५१२ सदस्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बिल्डरला त्यांची संमती दिली आहे. या प्रस्तावाची छाननी जवळजवळ पूर्ण झाली असून, विकासकाच्या आर्थिक क्षमतेबद्दल वित्त विभागाचा शेरा मिळताच आम्ही प्रस्ताव मंजूर करू, असेही त्याने सांगितले. बिल्डरने मात्र आपल्याला येथील १२२२ कुटुंबांची संमती मिळाली असल्याचा दावा केला. भाडेकरूंपैकी बहुतांश आमच्यासोबत आहेत. प्रक्रियेनुसार आम्ही एसआरए अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली असून, आवश्यक त्या सर्व प्रक्रिया आम्ही पार पाडू, असे कंपनीच्या एका प्रवक्त्याने सांगितले.
कपडे सुकत घालण्याच्या जागेत ज्या धोब्यांच्या मालकीच्या दोऱ्या आहेत, आणि जे धोबी व कामगार झोपडपट्टीत राहतात, त्यांच्यात आत्तापर्यंत वाद होता. धोबी व कामगारांमध्येही, पुनर्विकास लोखंडवाला डेव्हलपर्सने करावा की किमया डेव्हलपर्सने, यावरूनही वाद होता. तथापि, स्थानिक रहिवाशांमध्ये एकमत होत नसल्याच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात त्यांच्याविरुद्ध निर्णय दिल्यामुळे दोघेही स्पर्धेतून बाहेर पडले. यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने नव्याने निविदा बोलावल्या असताना ओंकार रिअल्टर्सचे येथे पदार्पण झाले.