महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत धुळे जिल्ह्यात जानेवारी २०१३ अखेपर्यंत विविध प्रकारचे ८,८२६ तंटे दाखल झाले असून त्यापैकी केवळ १४६ तंटे सामोपचाराच्या माध्यमातून मिटविण्यात आले आहेत. सामोपचाराने तंटे मिटविण्याचा वेग अतिशय संथ असून त्यात विहित मुदतीत लक्षणिय वाढ न झाल्यास धुळे जिल्हा या विषयात गत वर्षी प्रमाणे पिछाडीवर राहू शकतो.
गाव पातळीवर छोटय़ा-मोठय़ा कारणांवरून तंटय़ांची सुरूवात होते. त्यात प्रारंभी कमी लोकांचा सहभाग असतो. छोटय़ा तंटय़ांचे कालांतराने मोठय़ा तंटय़ात रूपांतर होते. अशा मोठय़ा तंटय़ात अनेकांचा सहभाग असतो. कधीकधी दिवाणी तंटय़ातून फौजदारी तंटे निर्माण होतात. छोटय़ा कारणावरून निर्माण झालेला तंटा मोठा होऊन पुढे फौजदारी तंटा बनतो व त्यातून कुटुंब, समाज व गावाची शांतता धोक्यात येते. पर्यायाने असे तंटे मिटविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा व न्यायीक यंत्रणेवरील ताण वाढतो. तंटे मिटविण्यासाठी लोक न्यायालये व पर्यायी तंटे मिटविण्याची व्यवस्था यासारख्या पर्यायी व्यवस्था असल्या तरीही तंटे निर्माणच होऊ नयेत व निर्माण झालेले तंटे गावपातळीवरील मिटविले जावेत, याकरिता या मोहिमेची संकल्पना मांडण्यात आली आहे.
तंटे मिटविण्यासाठी गाव पातळीवर सौहार्दपूर्ण व सलोख्याचे वातावरण निर्माण करून त्याद्वारे आपआपसातील तंटे सोडविण्याची व्यवस्था या माध्यमातून करण्यात आली आहे. तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत शासनाने उपलब्ध करून दिलेल्या व्यवस्थेचा अपेक्षित लाभ घेण्यात धुळे जिल्हा अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
स्थायी व समतोल विकास साधण्यासाठी समाजात शांतता व सुरक्षितता आवश्यक असते. त्याकरिता शासनाने या मोहिमेंतर्गत गावातील तंटे गाव पातळीवर मिटविले जावेत आणि गाव पातळीवर तंटे निर्माण होवू नये, हे प्रमुख लक्ष्य ठेवले आहे.
ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीस तंटामुक्त गाव समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे. धुळे जिल्ह्यातील १५ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ५५१ गावांत ५५१ तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीमार्फत केवळ जे कायद्यातील तरतुदीनुसार मिटविता येऊ शकणार नाहीत, असे फौजदारी तंटे वगळता दिवाणी, महसूली, फौजदारी व इतर तंटे सामोपचाराने मिटविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तंटय़ांमध्ये स्थावर मालमत्तेचे मालकी हक्क, वारसा हक्क, वाटप, हस्तांतरण, शेतीचे मालकी हक्क, वारसा हक्क, अतिक्रमणे, शेतात जावयाचा रस्ता आदी कारणांवरून निर्माण झालेले तंटे, मालमत्ता व फसवणूक यासंबंधीचे अदखलपात्र व दखलपात्र फौजदारी गुन्ह्यांपैकी जे गुन्हे संबंधित पक्षकारांच्या सहमतीने व कायद्यानुसार मिटविता येऊ शकतात असे तंटे तसेच सहकार, कामगार, औद्योगिक क्षेत्रातील व इतर तंटे आदींचा त्यात समावेश आहे. धुळे जिल्ह्यात जानेवारी अखेपर्यंत दिवाणी स्वरूपाचे २३७२, महसुली २८९, फौजदारी ६१६५ असे एकूण ८,८२६ तंटे दाखल झाले आहेत.
या मोहिमेतर्गत त्यातील दिवाणी सहा, महसुली पाच तर फौजदारी स्वरूपाचे १३५ असे एकूण १४६ खटले सामोपचाराने मिटविण्यात यश मिळाले. तंटय़ांची एकूण संख्या आणि मिटविलेल्या तंटय़ांचे प्रमाण पाहता त्यात बरीच मोठी तफावत असल्याचे लक्षात येते. धुळे जिल्ह्यात गेल्यावर्षी दाखल झालेल्या १०,५१५ पैकी १,१४२ तंटे मिटविण्यात आले होते. यंदा जानेवारी अखेपर्यंतची स्थिती लक्षात घेतल्यास गतवर्षीच्या तुलनेत तंटे मिटविण्याचा वेग आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. या मालेतील तेरावा लेख.