नवीन चित्रपट पाहण्यासाठी या आठवडय़ात चित्रपटगृहात गेलात आणि राष्ट्रगीताच्या आधी ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो’, हे परिचित वाक्य कानावर पडले किंवा शिवसेनाप्रमुखांची छायाचित्रे पडद्यावर सरकू लागली, तर चमकू नका! कारण चौकाचौकात झळकणारे बॅनर्स, शाखेवर फडकणारा भगवा आणि शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र या चौकटीतून बाहेर पडत शिवसेना आणि ‘भारतीय चित्रपट सेना’ यांनी एका आगळ्याच पद्धतीने यंदा शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी येत्या २३ जानेवारी रोजी येणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची छायाचित्रे असलेली एक चित्रफित शुक्रवारपासून पुढील आठवडाभर महाराष्ट्रातल्या ३५० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये दाखवली जाणार आहे. ‘यूएफओ’ आणि ‘स्क्रबल’ यांच्या माध्यमातून दाखवण्यात येणारी ही चित्रफित अवघी एका मिनिटाची आहे. या चित्रफितीद्वारे शिवसेना बाळासाहेबांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करणार आहे, असे भारतीय चित्रपट सेनेचे अध्यक्ष अभिजित पानसे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.२३ जानेवारी हा दिवस शिवसेनेतर्फे विविध उपक्रमांद्वारे बाळासाहेबांच्या स्मृती जपण्याचा आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व आमदार दिवाकर रावते यांनी मात्र एका वेगळ्याच संकल्पनेच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विचार केला, असे पानसे म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांची काही छायाचित्रे एकत्र करून ती या चित्रफितीत संकलित केली आहेत. त्याचप्रमाणे तमाम शिवसैनिकांच्या भावना व्यक्त करणारा एक संदेशही यात समाविष्ट करण्यात आला आहे. ही चित्रफित शुक्रवारपासून आठवडाभर महाराष्ट्रातील ३५०हून अधिक चित्रपटगृहांत दाखवली जाणार आहे. त्यासाठी यूएफओ आणि स्क्रबल या कंपन्यांनी विनामूल्य सहाय्य केले आहे. ही चित्रफित वाहिन्यांवर दाखवण्यासाठीही आपले प्रयत्न चालल्याचे पानसे यांनी स्पष्ट केले.