*  उभारणीचा खर्च सिडकोने करण्याची सूचना
*  रेल्वेचा प्रस्ताव सादर
*  संजीव नाईकांनी घेतली सिडको अधिकाऱ्यांची भेट
*  नव्याने सर्वेक्षण होणार  
 ठाणे-वाशी-नेरुळ रेल्वे मार्गावर दिघा आणि बोनकोडे या दोन नव्या रेल्वे स्थानकांच्या उभारणीसाठी रेल्वे प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांची उभारणी सिडकोने केली आहे. त्यामुळे या दोन रेल्वे स्थानकांच्या उभारणीचा खर्च सिडकोने करावा, अशा स्वरूपाचे पत्र मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी सिडकोला पाठविले आहे. यासाठी आवश्यक अशी जागा संपादन करण्याचे कामही केले जावे, अशी विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे.
ठाणे-तुर्भे-वाशी रेल्वे मार्ग सुरू झाल्याने नवी मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवेचे एक वर्तुळ केव्हाच पूर्ण झाले आहे. या रेल्वे मार्गाचा विस्तार करत सिडकोने ठाणे-तुर्भे-नेरुळ तसेच ठाणे-तुर्भे-पनवेल अशा दोन नव्या मार्गावरही एव्हाना सेवा सुरू केली आहे. ठाणे-तुर्भेदरम्यान नव्या रेल्वे स्थानकांची उभारणी करताना सिडकोने ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे अशा पाच रेल्वे स्थानकांची उभारणी केली आहे. यापैकी रबाळे रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी उशिराने सुरू करण्यात आले. ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टय़ातील वेगवेगळ्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी हा रेल्वे मार्ग खूप सोयीचा ठरला आहे. रबाळे रेल्वे स्थानकामुळे औद्योगिक पट्टय़ातील प्रवाशांसाठी प्रवासी वाहतुकीचे एक नवे दालन खुले झाले. असे असले तरी अजूनही या मार्गावरील दोन स्थानकांमध्ये मोठे अंतर असल्याचा मुद्दा मध्यंतरी ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी उपस्थित केला होता. तुर्भे ते कोपरखैरणे या दोन स्थानकांदरम्यान बोनकोडे तर ऐरोली आणि ठाणेदरम्यान दिघा या नव्या स्थानकाची निर्मिती केली जावी, अशा स्वरूपाचा प्रस्ताव खासदार नाईक यांनी रेल्वेचे व्यवस्थापक सुबोध जैन यांच्यापुढे ठेवला होता. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी मध्यंतरी मुंबईतील रेल्वे प्रश्नांसंबंधी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीतही खासदार नाईक यांनी या नव्या रेल्वे स्थानकांच्या उभारणीचा मुद्दा लावून धरला होता. ठाणे-तुर्भे रेल्वे स्थानकांदरम्यान ठाणे-ऐरोली या दोन स्थानकांमधील अंतर मोठे असून वेळापत्रकानुसार हे अंतर कापण्यास लोकल गाडीस आठ मिनिटांचा वेळ लागतो. ऐरोली पलीकडे दिघा या उपनगरात गेल्या काही वर्षांत मोठी लोकवस्ती उभी राहिली आहे. त्यामुळे दिघा स्थानकाची आवश्यकता वेळोवेळी व्यक्त होते. या पाश्र्वभूमीवर या दोन्ही स्थानकांची कितपत गरज आहे, याची चाचपणी करण्यासाठी नव्याने सर्वेक्षण हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती रेल्वेतील वरिष्ठ सूत्रांनी वृत्तान्तला दिली. या स्थानकांची उभारणी करावयाची झाल्यास त्यासाठी लागणारा खर्च सिडकोने उचलावा, अशा स्वरूपाचा प्रस्ताव रेल्वेने सिडकोकडे दिला आहे. यासाठी लागणारी जागाही सिडकोने शोधावी, असे रेल्वेचे म्हणणे आहे. दरम्यान, या दोन स्थानकांच्या उभारणीसाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी सिडकोने पुढाकार घ्यावा या मागणीसाठी खासदार संजीव नाईक तसेच ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी सोमवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांची भेट घेतली. यासंबंधी सविस्तर सर्वेक्षण करून निर्णय घेतला जाईल, असे सत्रे यांनी स्पष्ट केले.