ग्रामीण भागातील आणि त्यातही जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे शिक्षणाच्या नावाने शिमगा हे सर्वसाधारणपणे आढळणारे चित्र आता पांढऱ्या फळ्यांच्या क्रांतीने बदलू लागले आहे. शहापूर तालुक्यातील पष्टेपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत काही महिन्यांपूर्वी डिजिटल वर्ग भरू लागले आणि बघता बघता तेथील २५ शाळांनी त्याचे अनुकरण केले. आता तोच कित्ता जिल्ह्य़ातील इतर शाळाही गिरवू लागल्या आहेत. सोमवारपासून भिवंडी तालुक्यातील वळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतही डिजिटल वर्ग भरू लागले आहेत.
नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास उत्सुक असणारे शिक्षक आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे ठाणे शहरापासून अवघ्या पाच किलोमिटर अंतरावरील गोदामांनी व्यापलेल्या भिवंडी तालुक्यातील वळ गावातील जिल्हा परिषद शाळेने डिजिटल वर्गाद्वारे इ-लर्निगच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. पहिली ते सातवीचे वर्ग असणाऱ्या या शाळेत १२६ विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. त्यातील ८० टक्के मुले गावातील गोदामात मोलमजुरी करणाऱ्या कामगारांची आहेत. शाळेत तीन शिक्षक होते. मात्र त्यातील एका शिक्षिकेची बदली करण्यात आली तर विद्यार्थी संख्या १५० पेक्षा कमी असल्याने मुख्याध्यापकांचे पद अतिरिक्त ठरवून त्यांची बदली करण्यात आली. त्यामुळे शाळेत संगीता पाटील आणि जर्नादन पवार हे दोनच शिक्षक उरले. अशा परिस्थितीत संतोष सोनावणे हे पदवीधर शिक्षक शाळेत आले. त्यांनी पष्टेपाडय़ाच्या धर्तीवर शाळेत डिजिटल वर्ग भरविण्याची कल्पना ग्रामस्थांसमोर मांडली. त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी ग्रामपंचायतीस केले. सरपंच वैशाली भोईर, उपसरपंच संजय पाटील आणि इतर सदस्यांनी त्यांची ही कल्पना उचलून धरली आणि शाळेने अक्षरश: कात टाकली. त्यामुळे महानगरांमधील तारांकित शाळांमधील शैक्षणिक सुविधा येथील विद्यार्थ्यांना मिळू लागल्या आहेत.

डिजिटल वर्ग असा आहे
शाळेतील एका वर्गात एलईडी प्रोजेक्टरमार्फत सर्व डिजिटल अभ्यासक्रम समोरील पांढऱ्या फळ्यावर पाहण्याची सोय आहे. प्रोजेक्टरमध्येच संगणक असून त्यात पहिली ते दहावीचा सर्व अभ्यासक्रम आहे. क्रमिक अभ्यासाबरोबरच प्रत्येक विषयासाठी आवश्यक पूरक संदर्भ माहितीही या प्रणालीत आहे. शाळेत सध्या सातवीपर्यंतच वर्ग भरतात, पण पुढील वर्षी आठवीचे वर्ग भरणार आहेत. सध्या दररोज प्रत्येक वर्गाला एक तासिका डिजिटल वर्गाचा लाभ घेता येतो. एलईडी तंत्रज्ञान असल्याने अतिशय कमी विजेवर ही यंत्रणा चालते

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…

शाळेचा नूरच पालटला
बऱ्याचदा ग्रामीण भागातील सधन कुटुंबे आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून शहरातील शाळांमध्ये घालतात. वळ गावही त्याला अपवाद नाही. मात्र आता शिक्षकांच्या उत्साहाने या शाळेचा अवघा नूरच बदलला आहे. मंदिराच्या सभागृहावर भरणाऱ्या शाळेत मुलांना डुगडुगत्या लोखंडी पायऱ्या चढून यावे लागत होते. शिक्षकांनी पाठपुरावा करून सीमेंट काँक्रिटच्या पायऱ्या करून घेतल्या. संपूर्ण शाळेला रंगरंगोटी करण्यात आली. अनेक अर्थपूर्ण चित्रांनी आणि सुविचारांनी शाळेच्या भिंती बोलक्या करण्यात आल्या. शाळेला पटांगण अथवा बगिचा नाही. तरीही व्हरांडय़ात मिळेल तिथे निरनिराळ्या रोपांची लागवड करण्यात आली. सरकारी छापाचे एकसुरी गणवेश बदलून रंगीबेरंगी कपडे देण्यात आले. त्यामुळे या शाळेतील मुलेही अगदी टायवगैरे लावून रुबाबात शाळेत येतात. यंदा प्रथमच शाळेचे स्नेह संमेलनही भरणार आहे. थोडक्यात जुलै महिन्यात अतिशय दुर्लक्षित असणाऱ्या या शाळेचे आता देखण्या ज्ञानमंदिरात रूपांतर झाले आहे.

अन्य गावांमध्येही डिजिटलचे वारे
केवळ सरकारकडे बोट दाखवून अथवा शासनाच्या नावे बोटे मोडण्यापेक्षा स्थानिक पातळीवर प्रत्येकाने यथाशक्ती पुढाकार घेतला तर परिस्थिती बदलता येते, हा धडा पष्टेपाडावासीयांनी घालून दिल्यानंतर अन्य गावांमधील शाळांमध्येही आता अशा प्रकारे डिजिटल वारे वाहू लागले आहेत. वळ येथील शाळेसही परिसरातील अनेक ग्रामस्थ भेट देऊ लागले आहेत.