सिंहस्थ कुंभमेळ्यात  कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनविषयक नियोजन करताना विविध यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव के. एच. गोविंदराज यांनी केले. प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांचे प्रशिक्षण लवकर घेऊन आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्याचीही सूचना त्यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदी उपस्थित होते. पूर किंवा साथरोगासारख्या नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन योग्य नियोजन करण्याची गरज गोविंदराज यांनी व्यक्त केली. कुंभमेळ्यात देशाबाहेरूनही भाविक येण्याची शक्यता असल्याने आणि त्यातच कुंभमेळा पावसाळ्यात येत असल्याने या सर्व परिस्थितीचा विचार करून विशेष दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मागील कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे भाविकांचा नाहक बळी गेला होता. त्यामुळे या कुंभमेळ्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती निर्माण होऊ नये यासाठी गोविंदराज अधिक दक्ष असल्याचे या बैठकीत दिसून आले. त्यामुळेच आपत्तीविषयक धोका कमी करण्यासाठी भाविकांची संख्या विविध भागांत विभागली जाईल या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना त्यांनी या वेळी केली.
कुंभमेळ्यात प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांची प्रशासनास अधिक मदत होणार आहे. पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांची कमी संख्या लक्षात घेता प्रशिक्षक, स्वयंसेवक यांच्यावरही महत्त्वपूर्ण जबाबदारी येऊ शकते. त्यामुळे प्रशिक्षक आणि स्वयंसेवक किती प्रमाणात सक्षम करता येतील हे पाहणेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे लक्षात घेऊन त्यांचे प्रशिक्षण लवकर घेऊन आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करता येईल काय, या संदर्भातही विचार करण्याची सूचना गोविंदराज यांनी केली आहे. विविध विभागांमध्ये समन्वय राहिल्यास आपत्तीच्या वेळी माहिती त्वरित देणे व आपत्तीला त्वरित अनुकूल प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाही करणे शक्य होईल.
कुंभमेळ्यात बहुतेक भाविक प्रथमच नाशिकमध्ये येणार असल्याने त्यांना शहराची माहिती नसणार. त्यामुळे भाविकांना शहरातील विविध भागांची आणि मार्गाची माहिती सहजपणे कळावी यासाठी दिशादर्शक फलक उभारण्याची सूचना त्यांनी केली. प्रत्येक विभागाने आपल्या कामकाजाशी संबंधित आपत्तीचा अभ्यास करून पथक स्थापन करण्याविषयी त्यांनी नमूद केले.
यशदामार्फत विविध विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासून देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डवले यांनी बैठकीत दिले. प्रत्येक विभागाने आपल्या विभागाशी संबंधित आपत्ती व्यवस्थापनाविषयीचे नियोजन तयार करावे. पहिल्या टप्प्यात विभागप्रमुखांना तातडीने प्रशिक्षण देऊन आणि त्यानंतर विशिष्ट यंत्रणांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यांनी कुंभमेळ्यातील सूक्ष्म नियोजनाबाबत बैठकीत आढावा घेतला. कुशावर्त येथील जलशुद्धीकरणाची चाचणी त्वरित करण्यासंदर्भातही त्यांनी संबंधितांना सांगितले.