दोन आठवडे उशिरा लागलेली निवडणूक, असह्य़ उन्हाळा, मुलांच्या शैक्षणिक सुटय़ा, सहलीला जाण्याचे आखलेले बेत, गावातील जत्रा, यात्रा, लगीनसराई, अक्षय्य लग्नाचा गुजरातमधील मुहूर्त, कामाच्या दिवशी घेतलेले मतदान, पोटापाण्यासाठी नवी मुंंबई बाहेर जाणारे चाकरमनी, यासारख्या कारणांमुळे नवी मुंबईतील मतदारांमध्ये पालिका निवडणुकीसाठी एकंदरीत निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे. त्याची काळजी सर्व उमेदवारांना असली तरी सर्वाधिक चिंता शिवसेना-भाजपा युती व अपक्ष उमेदवारांना लागून राहिली आहे.
नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत हे मतदानाची वेळ आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीत नवी मुंबईतील दोन मतदार संघात झालेल्या ५० टक्यापेक्षा जास्त मतदानामुळे गणेश नाईक व त्यांचे चिरंजीव संजीव नाईक यांना फटका बसला. बेलापूर मध्ये केवळ ४९.६९ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मतदान जास्त व्हावे, अशी शिवसेना- भाजप युतीच्या नेत्यांची इच्छा आहे पण कमी मतदानाच्या भितीमुळे या उमेदवारांचे व नेत्यांचे अवसान गळून पडले आहे.
सर्वसाधारणपणे यापूर्वी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात पालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षांमुळे पालकांना शहरात थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळेचे एप्रिल २०१० रोजीच्या निवडणुकीत ५०.६५ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. यावेळी मतदान दिवसापर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा संपलेल्या आहेत. त्यामुळे पालकांनी सहल, किंवा गावाचे त्याचबरोबर यत्रा, जत्रांचे बेत आखले असल्याचे दिसून येत आहे. केंद्र आणि राज्यात करावयाच्या परिवर्तनामुळे मतदारांनी या दोन्ही निवडणुकीत मतदानाचा पन्नास टक्यापेक्षा जास्त पल्ला गाठलेला होता मात्र सतत तीन वेळा करावे लागणारे मतदान, त्यामुळे मतदान केंद्रावर जाऊन रांगेत उभ्या राहण्याचा आलेला कंटाळा, केंद्र सरकारबद्दल असलेली काहीशी नाराजी,४० अंश सेल्सीअंश पेक्षा जास्त असलेले तापमान, त्यामुळे बाहेर पडल्यानंतर अंगाच्या काहीलीचा करावा लागणारा सामना, घामाच्या धारा, अक्षय्य तृतीयांच्या मूर्हतावर निघालेले लग्नाचे मूर्हत, त्यानिमित्ताने आप्तेष्टांना भेटण्यासाठी गावी गेलेले चाकरमनी, गुजरात मध्ये अक्षय तृतीयांच्य दिवशी असलेले लग्नाचे महत्व यामुळे या बहुंताशी गुजराती समाजाने गाठलेले अहमदाबाद, कच्छ, बुधवार या कामाच्या दिवशी ठेवण्यात आलेले मतदान यामुळे मतदानावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पालिकेने मतदानाचा जास्तीत जास्त नागरीकांनी अधिकार बजवावा यासाठी अनेक जनजागृती कार्यक्रम घेतले असून मंगळवारी संध्याकाळ पर्यंत ते सुरु होते. यात ३६ पथनाटयांचा समावेश करण्यात आला होता. मतदार जनजागृती वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केल्यानंतरच गावी जाण्याचे आवाहन या पथनाटय़ाद्वारे करण्यात येत होते. पालिकेने २४ जागांवर भव्य होर्डिग्ज लावले असून त्याद्वारे देखील प्रबोधन करण्यात आले आहे. याशिवाय सोशल मिडियावर मतदानाविषयी जागृती केली जात आहे. तरीही लोकसभा विधानसभा निवडणूकीला असलेला उत्साह मतदारांमध्ये दिसून येत नाही. काही उमेदवारांनी प्रचारासाठी सुट्टी पडलेल्या मुलांना तर काहींनी नाका कामगारांना भाडय़ाने घेतले होते. त्याचे दिवसाला ४०० ते ५०० रुपये मानधन दिले जात होते. त्यामुळ प्रचारालाही मैदानात उतरण्याचे कार्यकर्त्यांचे दिवस आता सरले असल्याचे काही उमेदवारांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या आदेशाने पालिका निवडणुकीसाठी खासगी अस्थापनांना सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या अस्थापनांना अशी सुट्टी देता येत नसेल त्यांनी दोन तास मतदानासाठी कर्मचाऱ्यांना द्यावेत, असे आदेश दिले आहेत मात्र नवी मुंबईतील दीड लाख कर्मचारी मुंबईत कामाला जात असून त्या ठिकाणी त्यांना सुट्टी देण्याबाबत कोणतेही सूचना पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे तेथील कामगार केवळ मतदानासाठी नवी मुंबईत येऊन पुन्हा कामावर जाण्यास तयार नाहीत. त्याचा परिणामही मतदानावर होणार आहे. शहर विकासासाठी येथील नागरिकांना मतदानाचा हक्क बजवावा, असे पालिकेच्या वतीन वारंवार जाहीर करण्यात आले आहे. मतदानाच्या निरुत्साहाचे अनेक कारणे एकाच वेळी चालून आल्याने यावेळी मतदान कमी होण्याची भिती सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे.

ओळखपत्र सोबत ठेवा..
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी बुधवारी २२ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेलेल्या मतदाराने ओळख पटविण्यासाठी छायाचित्र असलेले ओळखपत्र सादर करावे असे सूचित करण्यात आले आहे. त्यासाठी तसेच आवाहन करण्यात आले आहे. छायाचित्र असलेल्या ओळखपत्रात पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी त्यांची सेवेतील ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बँका अथवा पोस्ट संस्थांमधील खातेदारांचे पासबुक, स्वातंत्रसैनिकांसाठी त्यांचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, राज्य निवडणूक आयोगानी निवडणूक आयोगाने आधीच्या तारखेपर्यंत असणारे जातीचे प्रमाणपत्र, अपंगत्वाचा दाखला, मालमत्तेबाबतची कागदपत्रे, शस्त्रास्त्राचा परवाना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील ओळखपत्र, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे पासबुक, निवृत्त प्रमाणपत्र, आरोग्य विमा योजनेचे कार्ड, रेशनिंग कार्ड, अधार कार्ड यांचा समावेश आहे. अशा छायाचित्र असलेल्या पुराव्यापैकी कोणताही एका पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
पालिका निवडणुकीसाठी उमेदवार बोगस पॅनकार्ड, कंपनीचे ओळखपत्र राज्य सरकारचे ओळखपत्र, रेशंनिग कार्ड, तयार करून नवी मुंबई बाहेरील मतदारांना आणून त्यांच्यामार्फत मतधिक्य मिळवण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत, अशा अनुचित घटनांवर निवडणूक आयोग व पोलिसांची बारकाईने नजर असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

पर्याय नाही..
यावेळी पालिकेच्या निवडणुका या उशिरा घेण्यात आल्या असून सुट्टी पडल्याने उन्हाळ्यात मुलांना गावी सोडण्यासाठी जावे लागणार आहे. याच काळात लग्नाचा मुहूर्त व जवळच्या नातेवाइकांचे लग्न असल्यामुळे गावी जावेच लागणार आहे. गावी जाऊन पुन्हा येणे व मतदान करून पुन्हा जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे यंदा मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.
विकास रावडे, ऐरोली

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काम करीत असणाऱ्या नागरिकांना मतदानाच्या दिवशी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्यात आली आहे, पण मी मुंबईमध्ये कामासाठी जात असल्यामुळे मला सुट्टी घेता येणार नाही. कामाच्या दिवशीच मतदान घेण्यात येत असल्यामुळे मला मतदान करता येणार नाही, याची खंत वाटते.
सनी धुमाळ, नेरुळ

वर्षांतून एकदाच उन्हाळ्यात मुलांना मोठी सुट्टी येत असल्यामुळे मुलांना घेऊन सहलीला जाण्यासाठी अगोदरच बुकिंग करून ठेवले आहे. अक्षय्य तृतीया, शनिवार व रविवार सुट्टी येत असल्यामुळे बुधवारपासूनच सहलीला जाण्याचा कार्यक्रम सहा महिने अगोदरच करण्यात आला आहे. त्यामुळे मतदान करण्यास मिळणार नाही.
हर्षल मोकाशी, ऐरोली

वर्षांतून एकदाच गावची जत्रा येते. त्या दिवशी सर्व नातेवाईक एकत्र येतात. त्यात लग्नकार्य पण आहे. म्हणून कामातून एक आठवडय़ाची सुट्टी घेतली आहे. त्यामुळे मतदान करता येणार नाही.
नवनाथ मिडगुले, ऐरोली