महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणी सोमवारी बरखास्त करण्यात आली. मनसेचे विधिमंडळातील गटनेते आमदार बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या काही दिवसांत काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल व जुन्या कार्यकर्त्यांचाही सन्मान केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मनसेच्या कार्यकारिणीत कमालीचे मतभेद होते. एका जाहीर भाषणात नांदगावकर यांनी आता कार्यकर्त्यांचे कान पिळण्याऐवजी कान उपटावे लागतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला. येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी मनसेकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. प्रत्येक बूथपर्यंत संपर्क वाढविण्यासाठी अभियानही सुरू केले जाणार आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन नांदगावकर यांनी केले.
गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांमधील रस्सीखेचीची चर्चा सुरू होती. त्यावर उपाययोजना व्हावी म्हणून मनसे जिल्हास्तरीय नेत्यांनी काही आंदोलने हाती घेतली. लोकसभा निवडणुकीपूर्वी कार्यकारिणीत करण्यात येणारे बदल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.