ठाण्यास खेटून असलेले दिवा सध्या मुंबईतील बडय़ा बिल्डरांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’ ठरू लागले आहे. दिवा, शीळफाटा, त्यालगत असलेला २७ गावांच्या परिसरात उभ्या राहणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक सुरू आहे. ठाणेपल्याड कल्याण, डोंबिवलीचा पर्याय स्वीकारण्यापेक्षा ठाणे-मुंबईस जवळ असलेला ‘गडय़ा आपला दिवा बरा’, अशा विचाराने या भागात राहावयास येणाऱ्या नव्या रहिवाशांचा आकडाही काही लाखांच्या घरात पोहोचला आहे.
लोढा, पालवा यांसारख्या मोठय़ा ‘नागरी वसाहतींना’ हिरवा कंदील दाखविताना राज्य सरकारने या भागातील दळणवळण व्यवस्थेकडे मात्र पुर्णपणे डोळेझाक केली असून गेल्या काही वर्षांपासून धुमसत असलेल्या दिव्याचा शुक्रवारी झालेला उद्रेक म्हणजे हिमनगाचे टोक असल्याची प्रतिक्रिया आता व्यक्त होऊ लागल्या आहेत. दिव्यालगतच्या जमिनी बिल्डरांसाठी खुल्या करून देणाऱ्या सरकारने प्रवाशांच्या नशिबी मात्र अंधारच वाढून ठेवल्याचे चित्र आहे.
लोकल गाडय़ांच्या क्षमतेपेक्षा तीन ते चार पट अधिक प्रवासी वाहतूक होत असलेल्या उपनगरीय गाडय़ांमधून प्रवास करणारे प्रवासी अपघाताचे बळी ठरू लागले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कल्याण, डोंबिवली आणि पल्याड असलेल्या स्थानकांमधून सुटणाऱ्या लोकल डोंबिवली स्थानकात येताना प्रवाशांच्या गर्दीने खच्चून भरलेल्या असतात. मुंबईच्या दिशेने जाणारी डोंबिवलीतून सुटली की दिव्यात येताना मुंगी शिरायलाही जागा नसते. त्यामुळे दिवा-मुंब्य्रातील प्रवाशांच्या नशिबी लोकलच्या दरवाजात उभा राहून ताटकळत प्रवास ठरलेला असतो.
खचाखच भरलेल्या लोकलमध्ये दरवाजात उभे राहून होणारा प्रवास म्हणजे अपघाताला निमंत्रणच. लोकलमधून पडून मरण पावलेल्या प्रवाशांचा आकडा सर्वाधिक दिव्यातलाच. या पाश्र्वभूमीवर दिव्यातून  लोकल सोडली जावी ही येथील रहिवाशांची जुनी मागणी आहे. दिवा स्थानकातून मुंबईकडे जाणारी व परतणारी गाडी उपलब्ध झाल्यास कळवा-मुंब्रा स्थानकातील प्रवाशांनाही हक्काची लोकल उपलब्ध होईल आणि इतर गाडय़ांवरील भार कमी होईल. यासाठी प्रवासी संघटनांनीही प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांना अजून तरी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला नाही. नव्या वेळापत्रकामध्येही दिव्यातील प्रवाशांना प्रशासनाने ठेंगा दाखविल्याने असंतोषाने टोक गाठल्याचे चित्र दिसू लागले आहे.  
प्रवासी बेहाल..
ठाण्याच्या घोडबंदर मार्गावरील इंच इंच जागेवर गृहप्रकल्प उभे केल्यानंतर मुंबईतील बडय़ा बिल्डरांनी सध्या आपला मोर्चा दिवा आणि आसपासच्या परिसराकडे वळविला आहे. शिळफाटय़ापासून कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावर २७ गावांच्या लगत लोढा उद्योग समूहाची बडी ‘नगरी’ उभी राहिली आहे. याच भागात पालवा, आकृती अशा बडय़ा बिल्डरांच्या मोठय़ा वसाहती उभ्या राहात आहेत.
मुंब्रा परिसरात बेकायदा इमारत कोसळून ७४ जणांना जीव गमवावा लागल्यानंतरही दिव्यातील मूळ भागात अजूनही मोठय़ा संख्येने बेकायदा वस्त्या उभ्या राहात आहेत. एकीकडे मोठय़ा बिल्डरांच्या गगनचुंबी वसाहती आणि दुसरीकडे नियोजनाच्या आघाडीवर फसलेले, बकाल असे दिव्याचे दोन चेहरे पाहायला मिळत आहे. कल्याण, डोंबिवलीच्या तुलनेत मुंबई, ठाण्याच्या जवळ असलेल्या दिव्यात लाखोंच्या संख्येने कुटुंब राहायला येत आहेत. असे असताना या भागात ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाची (टीएमटी) एखादी बस वाढवितानाही महापालिका आढेवेढे घेते असे चित्र आहे. त्यामुळे येथील रहिवासी संतापले असून शुक्रवारी झालेला उद्रेक अनेकांना अपेक्षितच होता.