भारताची फाळणी हा भावनेचा नाही तर संशोधनाचा विषय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी रविवारी संध्याकाळी मुलुंडमध्ये केले.  
मुंलुड येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या वतीने सु. ल. गद्रे सभागृहामध्ये पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात राजकीय समीक्षक व विश्लेषक डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते प्रा. शेषराव मोरे यांना सु. ल. गद्रे साहित्यिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. २५ हजार रोख आणि मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार ही प्रेरणा आणि ऊर्जा असते, त्यातून आणखी काही तरी करण्याची ताकद मिळते. त्यामुळे या पुरस्कारामुळे माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
आपण फाळणी वाईट अर्थाने गृहीत धरली, पण फाळणीऐवजी येणारा भारत कसा होता, कसे राहणार होतो, याचा विचार केल्याशिवाय फाळणी वाईट की चांगली ठरवता येणार नाही. गांधीजींनी विशिष्ट प्रकारचा अखंड भारत नाकारला, त्याच्या परिणामी फाळणी झाली असेही त्यांनी सांगितले.
डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी ‘अखंड भारत..’ पुस्तकाचे शीर्षक तसेच त्यातील मुद्दय़ांबाबत प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या. त्या मुद्दय़ांचा सविस्तर परामर्श प्रा. मोरे यांनी घेतला.