पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला बळजबरीने घेऊन जाऊ अशी धमकी पतीकडून देण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर कुटुंब न्यायालयाने पत्नीला घटस्फोट मंजूर करत दिलासा दिला आहे. ही महिला दुसऱ्या पतीच्या उलटसुलट आर्थिक व्यवहारांमुळे त्रस्त झाली होती. त्यातून सासू-सासऱ्यांकडून होणाऱ्या छळामुळे तिने कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
पतीकडून क्रूर वागणूक मिळत असल्याचा दावा करत महिलेने घटस्फोटासाठी नोव्हेंबर, २०१४ मध्ये न्यायालयात धाव घेतली होती. या दाम्पत्याचा फेब्रुवारी २००८मध्ये विवाह झाला होता. हा या महिलेचा दुसरा विवाह होता. तसेच तिला पहिल्या पतीपासून एक मुलगाही होता, परंतु लग्नानंतर काही दिवसांतच नवऱ्याने वेगवेगळी कारणे देत या महिलेची आर्थिक लुबाडणूक करण्यास सुरुवात केली.
विवाहानंतर पतीच्या भावाचा अपघातात मृत्यू झाला, परंतु अंत्यसंस्कारासाठी पुरेसे पसे नसल्याने त्याने पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवले. त्यानंतरही त्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी तिचे उर्वरित दागिनेही गहाण ठेवले. मात्र त्याचा व्यवसायाचा हा प्रयत्नही फसला. त्याआधी तो एका कंपनीत नोकरी होता व व्यवसाय करायचा म्हणून त्याने नोकरी सोडली होती, परंतु व्यवसायाचा प्रयत्नही फसल्याने तो कर्जबाजारी झाला होता. लोक कर्जाचे पसे मागण्यासाठी त्याच्या घरी येऊ लागले. अखेर कुठलाच मार्ग न उरल्याने पत्नीचे त्याच्या कर्जाचे एक लाख रुपये फेडले. गहाण ठेवलेले दागिनेही तिने सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने ते कुठे गहाण ठेवले हे न कळल्याने ती दागिनेही सोडवू शकली नाही.
मुलाच्या पहिल्या वाढदिवसासाठी बनवलेली सोन्याची चेन जेव्हा पतीने तिच्या नकळत काढून नेली, तेव्हा मात्र तिचा संयम सुटला आणि पती व सासू-सासऱ्यांच्या छळाला कंटाळून अखेर तिने नोव्हेंबर, २०१२मध्ये घर सोडले. त्यानंतर मुलाला घेऊन जाईन, अशी धमकी पती तिला देऊ लागला. त्यामुळे छळवणुकीतून सुटकेचा मार्ग म्हणून तिने घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने पतीला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली, परंतु त्याने एकाही नोटिशीला उत्तर दिले नाही. अखेर पत्नीने सादर केलेले पुरावे ग्राह्य़ मानून तसेच पतीकडून तिला क्रूर वागणूक दिली जात असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने तिची घटस्फोटाची मागणी मान्य केली.
पतीकडून आपली विनाकारण छळवणूक केली जाते, तो सतत घटस्फोटाची मागणी करतो आणि मुख्य म्हणजे मुलाला बळबरीने हिसकावून नेण्याची धमकी देत असल्याचा आरोप पत्नीने घटस्फोटाची मागणी करताना केला होता.