कळंबोली येथील नीलसिद्धी अमेरांते गृहप्रकल्पावर दीड वर्षांनंतर महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांची ‘वीजकृपा’ झाली आहे. दीड वर्षांपासून या गृहप्रकल्पातील तीनशे सदनिका विजेविना असल्याने या सदनिकाधारकांवर स्वत:चे घर असून भाडय़ाने राहण्याची वेळ आली होती. गणेशोत्सवात या सदनिकाधारकांनी महावितरणच्या कार्यपद्धतीविरोधात आंदोलन केले होते.
नीलसिद्धीचे विकासक व महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) अजय मेहता यांच्यात झालेल्या तात्त्विक लढाईमुळे येथील सदनिकांना वीज न देण्याचा निर्णय महावितरणच्या मेहता यांनी घेतला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून याबाबतची लढाई न्यायालयात सुरू होती. सीजीआरएफच्या निर्णयानंतरही या प्रकल्पाला वीज दिली जात नव्हती, असे विकासकांचे म्हणणे होते. आठ दिवसांपूर्वी महावितरणच्या वतीने या सदनिकाधारकांना अपुऱ्या विजेचे कारण देऊन वीज मिळणार नसल्याचेही सांगण्यात आले. मात्र मंगळवारी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक मेहता आणि विकासक संदीप संपत यांची बैठक झाली. या बैठकीत सुमारे तीनशे सदनिकांना वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे दिवाळीच्या दोन दिवसांमध्ये नीलसिद्धी गृहप्रकल्प प्रकाशमय होणार आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून स्वत:चे घर असूनही घरात न राहता गृहकर्जाचे हप्ते भरणाऱ्या सदनिकाधारकांचा गृहप्रवेश ऐन दिवाळीमध्ये होणार आहे. मेहतांच्या वीजकृपेच्या या बातमीमुळे मंगळवारची धनत्रयोदशी या गृहप्रकल्पातील तीनशे सदनिकाधारकांसाठी लक्ष्मीपावलांची ठरली आहे.