रोषणाई, आतषबाजीने साजऱ्या होणाऱ्या दिवाळीने शहरे उजळतात, पण शहरांपासूनच जवळ असलेल्या अनेक गावापाडय़ांत याही काळात अंधारच असतो. या गावांमध्ये रोषणाई करण्यासाठी यंदाही मुंबईतील महाविद्यालयीन तरुणांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या सात वर्षांपासून अनेक महाविद्यालयांमधील विद्यार्थी दिवाळीच्या फराळाबरोबरच विविध संदेश घेऊन दिवाळी साजरी करण्यासाठी गावापाडय़ांवर जात असून ही प्रथा यंदाही उत्साहाने पार पाडली जाणार आहे.
मुंबईतील के. सी. महाविद्यालयातील ४५ विद्यार्थी सध्या सफाळा येथून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या करवाळे गावात दिवाळी साजरा करीत आहेत. या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांसाठी फराळ, फटाके, आकाशकंदील नेले आहेत. हे सर्व विद्यार्थी गावांतील प्रत्येकाच्या घरात जाऊन पणत्या लावतात आणि रांगोळी काढतात. तसेच त्यांना फराळ देऊन त्यांना दिवाळीबद्दलची माहिती देतात. संध्याकाळी गावांतील लहान मुलांसोबत कमी प्रदूषण करणारे फटाके वाजवून त्यांचे काही क्षण सुखाचे करतात. या गावांत ८०० लोकसंख्या असून त्यातील ५०० जणांपर्यंत दिवाळी सणाचा आनंद पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे के. सी. महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे प्राध्यापक डॉ. सतीश कोलते यांनी स्पष्ट केले. शहरांतील विद्यार्थ्यांना तेथील झगमगाट नेहमीच दिसत असतो. पण या झगमगाटापलीकडे आपल्याजवळ अंधारात राहणारी गावेही आहेत, याची जाणीव व्हावी यासाठी हा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
परळ येथील एम. डी. महाविद्यालयातील २१ विद्यार्थी आणि शिक्षक सध्या बदलापूर पूर्वेतील ताडवाडी-धामणवाडी या गावांमधील आदिवासी लोकांबरोबर दिवाळी साजरी करीत आहेत. या विद्यार्थ्यांनीही घरातून उटण्याची पाकिटे, दिवाळीचा फराळ आणि फटाके नेले आहेत. या गावांत महाविद्यालयातर्फे गेली सात वष्रे विविध सणांचे आयोजन केले जाते. तसेच गावांतील सुधारणांचे कामही केले जाते. हे पाहून तेथील भोज या गावांतील काही गावकऱ्यांनी संपूर्ण गाव व्यसनमुक्त करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन या विद्यार्थ्यांना केले होते. यामुळे यंदा त्या गावातही दिवाळी साजरी करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अविनाश कारंडे यांनी स्पष्ट केले. याचबरोबर गावकऱ्यांना व्यसनमुक्तीचे धडेही दिले जाणार आहेत. या गावांमध्ये जाण्यापूर्वी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काळाचौकी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांसोबत दिवाळी साजरी केली. या मुलांना शिकवण्याचे काम करण्यासाठी महाविद्यालयाने ‘स्वप्नपूर्ती’ नावाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातील १९ विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालय व्यवस्थापनाने सहकार्य केल्याचे डॉ. कारंडे यांनी स्पष्ट केले. गावापाडय़ात जाऊन दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम गेल्या सात वर्षांपासून सुरू असल्यामुळे याचा फायदा मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात झाल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले आहे.