दीपावलीनिमित्त उल्हासाच्या रंगांची उधळण सुरू झाली असली तरी या उत्सवाला सूरमयी साज चढविला जाणार आहे तो, पहाटे रंगणाऱ्या मैफलींनी. नेहमीप्रमाणे यंदाही या दिवशीच्या कार्यक्रमांसाठी उत्तर महाराष्ट्रातील विविध सार्वजनिक मंडळे, संस्था व संघटनांनी पुढाकार घेतल्याने ही पहाट खऱ्या अर्थाने सूरमयी होणार आहे. पाडवा पहाट आणि संगीत मैफल हे नाते यंदा अधिक दृढ होणार आहे.
नाशिकच्या सांस्कृतिक क्षितिजावर दरवर्षी अविस्मरणीय पाडवा पहाट फुलविणाऱ्या ‘संस्कृती नाशिक’च्या वतीने यंदा स्थानिक दिग्गज कलावंतांचा स्वराविष्कार अनुभविण्यास मिळणार आहे. बुधवारी पहाटे पाच वाजता पिंपळपारावर ही मैफल रंगणार आहे. प्रसाद खापर्डे, मकरंद हिंगणे, अविराज तायडे यांचे शास्त्रीय गान व त्यांना सुभाष दसककर, नितीन वारे या कलावंतांची साथ लाभणार आहे. यंदा स्थानिक कलावंतांचा आविष्कार अनुभवण्याची संधी संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक शाहू खैरे यांनी नाशिककरांना उपलब्ध केली आहे. कलाविष्काराद्वारे नाशिकची संस्कृती पताका सर्वदूर फडकविणाऱ्या नाशिककर स्त्री कलावंतांचा गौरव सोहळा यंदा पाडवा पहाटचे औचित्य साधून केला जाणार आहे. त्यात दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे सुवर्णपदक मिळविणारी अंजली पाटील, प्रायोगिक रंगभूमी गाजविणारी अनिता दाते, दूरदर्शन मालिका ते चित्रपटसृष्टी असा प्रवास करणारी नेहा जोशी, दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री मृणाल दुसानीस, नृत्यविशारद भक्ती देशपांडे, गायिका मीना निकम यांचा समावेश आहे. सांस्कृतिक विश्व समृद्ध करणाऱ्या या नाशिककन्यांना गौरविले जाणार आहे. पिंपळपारावरील यंदाच्या मैफलीचे हे वेगळेपण म्हणावे लागेल.
माजी उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे व माजी नगरसेवक सुहास फरांदे यांच्या पुढाकारातून शौनक अभिषेकी यांच्या गंधाळलेल्या स्वरांनी भाऊबीजेची पहाट होणार आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजता गंगापूर रस्त्यावरील प्रमोद महाजन उद्यानात हा कार्यक्रम होईल. लक्ष्मीपूजनच्या दिवशी गंगापूर रोडवरील नसती उठाठेव मित्र परिवारातर्फे दीपावली पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य विजय कोपरकर यांचे स्वर या मैफलीत गुंजणार असून त्यांना तबल्यावर श्रीकांत भावे व संवादिनीवर राजू परांजपे साथसंगत करणार आहेत. युनिक ग्रुपच्या वतीने बुधवारी पहाटे साडेपाच वाजता कवी सौमित्र तथा किशोर कदम यांची राजीवनगरच्या मैदानावर मैफल सजणार आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत विविध सामाजिक व सांस्कृतिक मंडळांच्या वतीने पाडवा पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून प्रकाशोत्सव सुमधुर स्वरांनी सजविला जाणार आहे.