दररोज घडय़ाळ्याच्या गजराने जागे होणारे शहर सनईच्या सुराने आणि फटाक्याच्या आवाजाने जागे झाले. शहरातील विविध भागात आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी केली.
नरकचतुदर्शनिमित्त घरोघरी सकाळी अभ्यंगस्नान करून देवपूजा करण्यात आली. शहरातील विविध भागात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सकाळी लोकांनी अभ्यंगस्नान केल्यानंतर सुरांचा आस्वाद घेतला. शहरातील विविध भागात झालेल्या कार्यक्रमांना रसिकांनी चांगलीच गर्दी केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातील लक्ष्मीनगर, त्रिमूर्तीनगर, रेशीमबाग, हनुमाननगर आदी ठिकाणी रस्त्यांवर रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. फटाक्यांच्या आवाजात, रस्त्यांवर उत्स्फूर्तपणे सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या जल्लोषात दिवाळी पहाट चांगलीच रंगली. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांबरोबर शुभेच्छांची देवाण-घेवाण करतानाच हातात असलेल्या मोबाईललाही विश्रांती नव्हती. एसएमएसवरून शुभेच्छा संदेश दिले-घेतले जात होते. शहरातील विविध वृद्धाश्रमात आणि अनाथआश्रमात दिवाळी साजरी करण्यात आली. अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकत्यार्ंना श्रद्धानंदपेठमधील अनाथालयात आणि पंचवटीमधील वृद्धाश्रमात जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. रेशीमबाग, सक्करदरामधील उद्यानात दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आस्वाद परिसरातील नागरिकांनी घेतला. निवडणुकीची धामधूम आटोपताच विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार आपापल्या मतदारसंघात परतले असून ते दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले.
गुरुवारी लक्ष्मीपूजन असल्यामुळे पूजनासाठी लागणारी लक्ष्मी (केरसुणी), तसेच पूजेसाठी लागणारे धने, साळीच्या लाह्य़ा, झेंडूची फुले, आंब्याची पाने, विडय़ाची पाने, नारळ, ऊस बत्तासे, साखरफुटाणे, रांगोळी, रांगोळीचे रंग, पणत्या आदी साहित्याची खरेदीही सर्वत्र सुरू होती. शहरभर लागलेल्या फटाक्यांच्या दुकानांमध्ये गर्दी होती. लक्ष्मीपूजनासाठी बाजारात लक्ष्मीच्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत ४० रुपयांपासून २०० रुपयापर्यंत लक्ष्मीची मूर्ती बाजारात उपलब्ध आहे. महाल इतवारी, गोकुळपेठ, सक्करदरा या भागात खरेदीसाठी लोकांची गर्दी दिसून आली.