दिवाळी सण काही तासांवर येऊन ठेपला असल्याने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची विशेषत: महिला वर्गाची झुंबड उडत आहे. ऐरोली, कोपरखरणे, वाशी, नेरुळ, सीबीडी आदी ठिकाणी असणाऱ्या बाजारात सध्या सगळीकडे दिवाळीसाठी आकाशकंदील, रांगोळया, पणत्या, फटाके खासकरून कपडय़ांची दुकाने सजली आहेत. फराळसाठी किरणा सामान, मिठाई, कपडे, कंदील खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे दिसत आहे. वाशी येथील एपीएमसी बाजार, ऐरोली सेक्टर तीन येथील मार्केट, कोपरखरणे येथील मार्केट, वाशी स्टेशनचा परिसर येथे महत्त्वाच्या रस्त्यांवर दुपारपासूनच गर्दी होत असल्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे.
नवी मुंबईतील वाशी येथे फटाका मार्केट, एपीएमसी मार्केट, वाशी स्टेशन परिसरातील मॉल आदी मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यावर सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत खरेदीदारांची मोठी गर्दी होत आहे. रस्त्यावर थाटलेल्या दुकानांतून लावलेले निरनिराळ्या आकारांचे आकाशकंदील संगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. इको फ्रेण्डली कंदिलांसह चिनी बनावटीचे आकर्षक कंदिलांचा यात मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे. सुबक सुंदर पणत्या आणि नानाविध प्रकाराचे रांगोळीचे रंग ग्राहकांना आकर्षित करत आहेत. दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य कितीही महाग झाले तरी गृहिणी आवर्जून दिवाळीत सर्व प्रकारचा फराळ करताना दिसतात. सध्या महिला वर्ग मोठय़ा प्रमाणावर कामासाठी रेडिमेड वस्तू घेण्याकडेच अधिक कल असल्याने दुकांनामध्ये गर्दी होत आहे. तसेच रस्त्यावर पदपथावर बसण्यात असणाऱ्या विक्रेत्यामुळे अंतर्गत रस्त्यावर वाहतूक कोंडीदेखील होत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यातच कशाही पद्धतीने रस्त्यात वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच अधिकच भर पडत आहे.
महिला बचत गटांच्या दिवाळी फराळाला मागणी  
अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली आहे. दिवाळी म्हटले की फराळ आलाच. त्यामुळे सर्वच ठिकाणी हा फराळ बनवण्याची लगबग सुरू आहे. या संधीचा फायदा उठवण्यासाठी बचत गटही पुढे सरसावले आहेत. दिवाळीत बहुतेक पदार्थ महिला घरी बनवतात. मात्र नोकरी करणाऱ्या महिलांना रोजच्या धावपळीत फराळ बनवणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांची पावले वळतात ती रेडिमेड पदार्थ खरेदी करण्यासाठी दुकांनाकडे. पण आता महिला बचत गटांनी फराळ बनवण्यासाठी पुढाकार घेतल्याने दुकानांमधून फराळ घेण्यापेक्षा बचत गटांतील महिलांकडून फराळ घेण्यासाठी ग्राहकांची रिघ लागली आहे. दर्जेदार आणि खंमग पदार्थ बचत गट दुकानांपेक्षा स्वस्तात देतात. त्यामुळे ग्राहकही हे पदार्थ घ्यायला पंसती देत आहेत. आर्थिक नफाही होत असल्यामुळे बचत गटातील महिलाही समाधानी आहेत. याबाबात जाईजुई महिला बचत गटाच्या रंजना रोडे सांगतात की, टीव्हीवरच्या मालिका बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा आम्ही महिला बचत गटांच्या माध्यमातून दिवाळीसाठी लागणारे फराळ बनवतो. त्याला नोकरदार महिला वर्गाकडून विकत घेण्यासाठी उत्तम प्रतिसाददेखील मिळत आहे. तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामामुळे दोन पैसे मिळत असल्याने कौटुंबिक हातभारदेखील लागत असल्याचे त्यांनी सांगितले.