संपूर्ण जग भारताकडे गुंतवणुकीचे एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून आज बघू लागले आहे आणि येणारी १० वष्रे हा शेअर बाजाराच्या दृष्टीने सर्वाधिक आश्वासक काळ राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सामान्य मध्यमवर्गाने उदासीनं न राहता यात अधिक क्रियाशील सहभाग घ्यावा, असा आमचा उद्देश आहे. बाजारात येताना या सामान्य ग्राहकाकडे अधिकाधिक माहिती पुरवून त्याला सक्षम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. वरकरणी हा सगळा व्यावसायिक प्रकार वाटत असला तरी लोकांमध्ये अर्थसाक्षरता निर्माण करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल राहणार आहे, असे मत मनी बी इन्स्टिटय़ूटची संचालिका शिवानी दाणी यांनी व्यक्त केले. मनी बीच्या वतीने सध्या नागपुरातील गुंतवणूकदारांना शेअर बाजारासंबंधांत साक्षर करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून एका महिन्यात १० हजार तरुणांना अर्थशिक्षित करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या अनुषंगाने ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान शिवानी यांनी नागपुरातील अर्थविषयक साक्षरता, गुंतवणुकीबाबत सामान्य ग्राहकांना असलेल्या संभाव्य संधी इत्यादी विषयांवर आपली मते व्यक्त केली.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नागपूर महापालिका, एलआयटी म्युच्युअल फंड व सीडीएसएलच्या सहकार्याने नागपुरात विविध ठिकाणी हे कार्यक्रम होत असून लोकांचा चांगला प्रतिसाद या कार्यक्रमांना मिळत आहे. शिवानीच्या मते या कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या लोकांचे वय हे सरासरी ३५ व त्यावरील आहे. बीएसई नागपुरात तक्रार निवारण केंद्र व एसएमई केंद्र सुरू करणार असून १० हजार तरुणांना संबंधित कौशल्ये शिकवणे व त्यातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘लोक कुठल्या तरी प्रलोभन देणाऱ्या संस्थांच्या नादी लागतात अन् स्वत:ची फसवणूक करवून घेतात. दुसरीकडे मुदत ठेवींच्या पलीकडे गुंतवणूक पर्यायांचा विचार करण्याची अजूनही आपली मानसिकता नाही. मात्र, थोडा धोका पत्करण्याची तयारी असेल तर संपत्तीनिर्माण होऊ शकते. अशी अर्थसाक्षरता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे शिवानीने सांगितले.
मुंबई विद्यापीठासारखी विद्यापीठे डी-मॅट खात्यांच्या मार्फत गुणपत्रिका देऊ लागली असताना अजूनही नागपूर-विदर्भात या खात्यांचे प्रमाण तुलनेने कमीच आहे. आज घडीला नागपूर शहरात  ४८ ते ५० हजार डी-मॅट खाती आहेत तर शेअर बाजारातील गुंतवणुकीचा आकडा ४ ते ५ हजार कोटींचा आहे. आर्थिक साक्षरतेत भारताचा जगात ३९वा क्रमांक लागतो. आपल्याकडे बचत सांगण्याची गरज नाही. मात्र, गुंतवणूक सांगण्याची आहे. अर्थजगतातील तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून लोकांना गुंतवणूक विषयक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवाय, डी- मॅट खात्यांशी संबंधित व्यवहार करण्यासाठी ‘डी-मॅट’ मेळाच घेणार आहे. आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद या कार्यक्रमांना मिळतो आहे. गाण्याच्या कार्यक्रमाला गर्दी होणे स्वाभाविक आहे. मात्र, आमच्या कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद अशा अर्थसाक्षरता विषयक कार्यक्रमांची गरज या शहराला होती, हे सिध्द करणारा असल्याचे दाणी यांनी सांगितले.  या अर्थसाक्षरतेतून अप्रत्यक्षरीत्या आपल्या येथील औद्योगिक विकासालाही चालना मिळण्याची शक्यता आहे. आजही लोकांची मुदत ठेवीची मानसिकता बदलली नाही. किमान आठ वर्षे वाट बघण्याची तयारी ठेवून शेअर बाजारात गुंतवणूक करावयास हवी, असेही मत दाणी यांनी व्यक्त केले.