विधानसभा निवडणुका निर्विघ्न पार पडाव्यात यासाठी नवी मुंबई पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे. मुसारे साडेपाच हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली असून तिसऱ्या डोळ्याच्या (सीसीटीव्ही कॅमेरे) माध्यमातून शहरातील प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे बारीक लक्ष राहणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील प्रवेशद्वारांवर नाकाबंदी लावण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील बेलापूर विधानसभा मतदारसंघात ३७५, ऐरोली विधानसभा मतदारसंघात ३७९ , पनवेल विधानसभा मतदारसंघात ४४१ आणि उरण विधानसभा मतदारसंघातील ३०९ मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. या मतदान केंद्रावर पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. मतदार, निवडणकू कर्मचारी, उमेदवार आणि आयोगाच्या प्रवेशाबाबत संमतीपत्र असलेल्या व्यक्तीव्यतिरक्ति कोणालाही मतदान केंद्रावर प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.  याचबरोबर पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील १५०० जणांविरोधात समन्स बजावण्यात आले आहे. ९०१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
याचप्रमाणे पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या वतीने केलेल्या कारवाईमध्ये २० शस्त्रे आणि २३ काडतुसे जप्त करण्यात आले असून गंभीर गुन्हे दाखल असलेल्या १५ गुंडांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. दारूबंदीच्या कारवायांमध्ये ३३ जणांना अटक करण्यात आली असून २ लाख ८१ हजारांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. याचबरोबर नाकाबंदीत पोलिसांनी ४५ लाखांची रोकड जप्त केली आहे.
शहरातील प्रवेशद्वारांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. यातून शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे. याचबरोबर शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक हालचाली टिपण्यात येणार आहेत. मतदानाच्या दिवशी ४५०० हजार पोलीस कर्मचारी आणि ५०० अधिकारी यांच्यासोबत केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दल याची अतिरिक्त कुमक आणि ८० मोबाइल पेट्रोलिंग वाहने पोलिसांच्या दिमतीला असणार आहेत. याशिवाय ऐरोली विधानसभा क्षेत्राची जवाबदारी पोलीस उपायुक्त शिवाजी उमाप, बेलापूर विधानसभा क्षेत्राची जबाबदारी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, पनवेल विधानसभा क्षेत्राची संजय यनपुरे आणि उरण विधानसभा क्षेत्राची जबाबदारी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अरंविंद साळवी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ४३ संवेदन केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.