स्वस्त दरात मिळणारी ‘जेनेरिक’ औषधे देखील ‘ब्रॅन्डेड’इतकीच गुणकारी असतात, असा निर्वाळा शहरातील वैद्यकीय तज्ज्ञ देत असताना ती रुग्णांना मात्र लिहून देत नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. दुसरीकडे रुग्णच जेनेरिक औषधांची मागणी करत नसल्याचे आणि औषधी दुकानात चांगल्या कंपनीचे जेनेरिक औषधे उपलब्ध नसल्याने आम्ही ते लिहून देत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जेनेरिक औषधे हे ब्रॅन्डेड कंपन्यांपेक्षा ३० ते ४० टक्के स्वस्त असतात. त्यामुळे नागरिकांनी जेनेरिक औषधांची मागणी करावी, असे आवाहन काही संस्था व वैद्यकीय क्षेत्रातूनच केली जात आहे. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारनेही जेनेरिक औषधे सर्व औषध विक्रेत्यांनी विक्रीसाठी ठेवावे, तसेच रुग्णांनी देखील जेनेरिक औषधांचा आग्रह धरला पाहिजे, असे म्हटले आहे. परंतु या आदेशाचा फज्जा उडाल्याचे दिसून येते. कारण बहुतांश औषधी दुकानात जेनेरिक औषधेच उपलब्ध नाहीत. परिणामी परिसरातील डॉक्टर्स जेनेरिक औषधे लिहून देत नाहीत. एक तर ही औषधे दुकानात उपलब्ध नसतात, तर दुसरीकडे रुग्णही ही औषधे लिहून देण्याचा आग्रह धरत नाही. रुग्णांनी आग्रह धरल्यास आम्ही जेनेरिक औषधे लिहून देण्यास तयार आहोत, असे मत शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. अविनाश रोडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. जाहिरातबाजी, त्यावर असलेला सरकारी कर, व्यापारी व केमिस्ट यांना द्यावे लागणारे कमिशन, वाहतूक खर्च यामुळे ब्रॅन्डेड औषधे ही जेनेरिक औषधांपेक्षा महाग पडतात. रॅनबॅक्सी, सिप्ला, ल्युपीन, अलेंबिक, बायोकेम यासारख्या कंपन्या जेनेरिक औषधे निर्माण करतात. जेनेरिक औषधे कोणत्या कंपन्या निर्माण करतात, यावरही त्याची मागणी अवलंबून आहे. सध्या अनेक कंपन्या जेनेरिक औषधे तयार करत आहेत. ती गुणवत्तापूर्ण असेल याची कुठलीही शाश्वती देता येत नाही. त्यामुळेही डॉक्टर्स जेनेरिक औषधे लिहून देत नाहीत. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावामुळे हे डॉक्टर्स जेनेरिक औषधे लिहून देत नाही, असा आरोपही त्यांच्यावर केला जातो. परंतु हा आरोप चुकीचा असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जेनेरिक औषधे ब्रॅन्डेड औषधांपेक्षा स्वस्त आहे, याचाच अर्थ त्यामध्ये गुणवत्ता नसावी, असा गैरसमज डॉक्टर आणि काही रुग्णांमध्ये दिसून येत आहे. शहरातील ९० टक्के डॉक्टर्स जेनेरिक औषधे ब्रॅन्डेड औषधांइतकेच परिणामकारक असल्याचे सांगतात. तर १० टक्के डॉक्टर्स जेनेरिकच्या परिणामकारकतेबद्दल शंका घेत असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे अजूनही ८० टक्के रुग्णांना जेनेरिक औषधांची माहितीच नसल्याचे दिसून येते. तर माहिती असलेल्यांपैकी बोटावर मोजण्याऐवढेच जेनेरिक औषधांची मागणी करत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ‘स्वस्त तेवढे महाग’ या म्हणीनुसार रुग्णही जेनेरिक औषधांच्या गुणवत्तेवर संशय घेत असल्याचे दिसून येते.  

डॉक्टरांवरील आरोप चुकीचे -डॉ. संजय देशपांडे
अमूक औषधे लिहून देण्यामागे डॉक्टर्स आणि त्या कंपनीचे काहीतरी संबंध आहेत, असा अर्थ काढला जातो. एक-दोन डॉक्टर्स असा प्रकार करत असतील तर सर्वच डॉक्टर्स तसे आहेत, असा संशय करून घेण्यात काहीच अर्थ नाही. रुग्णांना चांगली व गुणवत्तापूर्ण औषधे मिळावीत, संबंधित आजारातून त्याची सुटका व्हावी, हा आमचा प्रामाणिक हेतू असतो. दुसऱ्याबाजूने प्रत्येक औषधी दुकानात फक्त १० टक्केच जेनेरिक औषधेच उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांना ब्रॅन्डेड औषधे लिहून देण्याशिवाय पर्याय नसतो. रुग्णांनी आग्रह धरल्यास आम्ही चांगल्या कंपनीचे जेनेरिक औषधे लिहून देऊ शकतो. परंतु रुग्णही त्याची मागणी करत नाही. गरीब व सामान्य नागरिकांना स्वस्त औषधे उपलब्ध व्हावी, असे वाटत असेल तर शासनानेच जेनेरिक औषधांची दुकाने उघडावीत. असे झाले तर सर्वाचाच फायदा होईल, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे यांनी व्यक्त केले.