कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनातील सावळागोंधळाचा नवा नमुना पुढे आला असून कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात सेवा देणाऱ्या १५ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी चार डॉक्टरांनी कोणत्या वैद्यकीय संस्थांमधून वैद्यकीय पदव्या घेतल्या आहेत, याची माहितीच महापालिकेच्या दस्तऐवजात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.    
सफाई कामगारांची भरती असली तरी महापालिका प्रशासन तो उमेदवार चौथी किंवा आठवी पास आहे किंवा नाही याची कागदपत्रांच्या आधारे खात्री करते. असे असताना महापालिका हद्दीतील रुग्ण, नागरिक आपला लाखमोलाचा जीव ज्या पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या हातात उपचारासाठी सोपवितात त्या डॉक्टरांनी वैद्यकीय पदव्या कोणत्या संस्थांमधून घेतल्या आहेत, याची माहिती महापालिका प्रशासन मिळवू शकत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रुक्मिणीबाई रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी कोणत्या वैद्यकीय संस्थेमधून पदवी मिळवली आहे, याची माहिती जितेंद्र मुळ्ये यांनी मागवली होती. अशा १५ डॉक्टरांची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त विनय कुळकर्णी यांनी मुळ्ये यांना दिली आहे. डॉ. शशांक सोनेकर (एम.बी.बी.एस), डॉ. नीता भागवत (एम.बी.बी.एस., डी.डी.ओ), डॉ. रोहिणी ढवळे (एम.बी.बी.एस., डीओएमएस), डॉ. चंद्रकांत शेवाळे (एम.बी.बी.एस., एफसीपीएस व इतर वैद्यकीय पदव्या) या डॉक्टरांनी कोणत्या वैद्यकीय संस्थांमधून पदवी घेतली आहे, याची माहिती महापालिकेच्या दस्तावेजात उपलब्ध नसल्याचे प्रशासनाने जितेंद्र मुळ्ये यांना लिहून दिले आहे. गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेची शास्त्रीनगर तसेच रुक्मिणीबाई ही रुग्णालये रुग्णशय्येवर असून त्यांच्या तंदुरुस्तीसाठी प्रशासन कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही.
रुग्णालयातील एकूण व्यवस्थेचा भोंगळ कारभार वेळोवेळी पुढे आला असताना डॉक्टरांच्या पदव्यांचा नवा सावळागोंधळ उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

शास्त्रीनगरमध्ये ३५ जणांचा मृत्यू
महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात गेल्या वर्षभरात ३५ महिला, पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामधील २० महिलांचा बाळ गर्भात असताना मृत्यू झाला आहे. उर्वरित रुग्णांचा हृदयरोग, कुपोषणामुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा सारस्वत यांनी दक्ष नागरिक संघाचे विश्वनाथ बिवलकर यांना माहिती अधिकारात लिहून दिले आहे.