डोंबिवलीतील चिंचोडय़ाचा पाडा येथे राहणाऱ्या हेमंत म्हात्रे (२७) यांना डेंग्यू असल्याचा तपासणी अहवाल एका खासगी रुग्णालयात आल्यानंतर तातडीने हेमंत यांच्या नातेवाईकांनी त्यांना महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. शास्त्रीनगर रुग्णालयात हेमंत यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. तपासणी अहवालात मात्र त्यांना डेंग्यू नसल्याचे आढळून आले. दोन दिवस सुरू असलेल्या चाचण्यांनंतर हा निष्कर्ष काढण्यात आला. महापालिका रुग्णालयात हेमंत यांची प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी मात्र हेमंत यांना डेंग्यू असल्याचे निदान केले असून महापालिका आणि खासगी रुग्णालयात निदानाविषयी केल्या जाणाऱ्या परस्पर दाव्यांमुळे रुग्णांचे नातेवाईक चक्रावून गेले आहेत.
महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना डेंग्यू रुग्णाबद्दल अजिबात गांभीर्य नसल्याची टीका हेमंत यांचे नातेवाईक अ‍ॅड. उमेश भोईर यांनी केली आहे. महापालिका रुग्णालयातील या अनागोंदी कारभाराची प्रशासनाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यामार्फतही फारशी दखल घेतली जात नाही. महापालिका रुग्णालयामधील कारभाराविषयी अनेक तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. डेंग्यूचा आजार सर्वत्र बळावला असताना महापालिका रुग्णालयामध्ये या आजाराचे रुग्ण हाताळताना बेफिकीरी दिसत असल्याची टीकाही सातत्याने केली जात आहे. हेमंत म्हात्रे यांच्यावरील उपचारानिमित्ताने ही बेफिकीरी पुन्हा एकदा दिसून आली असून डेंग्यूचे निदान करताना महापालिका रुग्णालयात फारसे गांभीर्य नसल्याच्या तक्रारी सातत्याने वाढू लागल्या आहेत.
हेमंत यांच्या यकृताला सूज होती. डेंग्यूची लक्षणे दिसत होती. तरीही शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर वैद्यकीय तपासणी अहवालाचा हवाला देऊन हेमंतला डेंग्यू नाही अशीच भूमिका घेत उपचार करीत होते, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. शास्त्रीनगर रुग्णालयात हेमंतला दोन दिवस उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारण झाली नाही.  त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय चाचण्यांमध्ये हेमंतला डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले, असे अ‍ॅड. भोईर यांनी सांगितले.
अनेक गरीब रुग्ण खासगी रुग्णालयातील महागडे उपचार परवडत नाहीत म्हणून पालिका रूग्णालयांमध्ये उपचारासाठी येतात. त्यांच्यावर काळजीपूर्वक उपचार करणे गरजेचे असताना, अतिशय बेफिकीरपणे पालिका रुग्णालयांमधील डॉक्टर रुग्णांशी वागतात, अशा तक्रारी पुढे येत आहेत. महापालिका रुग्णालयातील प्रयोगशाळांमध्ये पुरेसा कर्मचारी, यंत्रणा नाही. त्यामुळे उपलब्ध साधन सामुग्रीत कर्मचारी काम करतात. शास्त्रीनगर रुग्णालयात ताप, थंडी शिवाय प्रभावी असे रुग्णावर उपचार होत नाहीत असे उमेश भोईर यांनी सांगितले. शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा सारस्वत यांनी सांगितले, ‘‘मी बैठकीला गेले होते. मला याबाबत काही माहिती नाही. मी शोध घेऊन सांगते.’’ कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत गेल्या दीड महिन्यात डेंग्यूचे सुमारे १२५ हून अधिक रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचा फैलाव होऊनही पालिका प्रशासन अतिशय ढिम्म असल्याची टीका केली जात आहे.
कर्मचाऱ्यांवर दबाव
महापालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयातील एक डॉक्टर व दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञांना मागील आठवडय़ात डेंग्यूची बाधा झाली होती. या विषयाचा गवगवा होऊ नये म्हणून महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बाधित डॉक्टरला ‘गुपचूप उपचार घे. मीडियाला कळवू नको’ म्हणून दम भरला होता. या डॉक्टरने आपल्या वरिष्ठांना ‘मला डेंग्यूवर उपचार करा,’ असे सांगितले होते. त्यावेळी ‘तुम्ही आणखी वरिष्ठांना भेटा’ म्हणून सांगून टंगळमंगळ केली होती.