विश्रांतीऐवजी कामाचा ताण वाढविणाऱ्या कॅनेडियन पद्धतीच्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्याच्या प्रशासनाच्या अट्टहासामुळे संतप्त झालेल्या बेस्टच्या चालक- वाहकांनी मंगळवारी बस आगारांकडे सामूहिकरित्या पाठ फिरविली. परिणामी बसगाडय़ांना आगारांमध्येच ब्रेक लागला. परंतु याबाबत अनभिज्ञ असलेल्या मुंबईकरांचा बस थांब्यांवर चांगलाच खोळंबा झाला. परिणामी त्यांना टॅक्सी-रिक्षाचा भरुदड सोसावा लागला. नेहमीप्रमाणे ‘टाळूवरचे लोणी खाणाऱ्या’ रिक्षा-टॅक्सी चालकांनी जवळचे भाडे नाकारल्याने अनेकांना मोठी पायपीट करावी लागली. प्रशासनाच्या हेकेखोरपणामुळे मंगळवारी दिवसभर मुंबईकर वेठीस धरले गेले.
बेस्टचे काही बसमार्ग पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास सुरू होतात. भल्यापहाटे सुरू होणाऱ्या बाजारांमध्ये जाण्यासाठी अथवा पहिल्या पाळ्यांमध्ये काम करणारी अनेक मंडळी या बसमधून प्रवास करीत असतात. नेहमीप्रमाणे ही मंडळी मंगळवारी पहाटे घराबाहेर पडली. मात्र थांब्यावर बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही बस येत नसल्याचे पाहून काहींनी घरचा रस्ता धरला. तर अनेकांनी जादा पैसे मोजून रिक्षा-टॅक्सीने इच्छित स्थळ गाठले. हळूहळू दिवस वर चढू लागला आणि मुंबईकर कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडले. परंतु रस्त्यावर बेस्टची एकही बसगाडी दिसत नसल्यामुळे सारेच हैराण झाले. शाळकरी मुले, महिलांचाही त्यात समावेश होता. बस आता येईल, मग येईल असा विचार करीत प्रवाशी थांब्यावरच खोळंबले होते. अखेर मिळेल ते वाहन पकडून अनेकांना रेल्वे स्थानक गाठावे लागले.
बस चालक आणि वाहकांच्या या उत्स्फूर्त आंदोलनामुळे टॅक्सी व रिक्षा चालकांनी नागरिकांची चांगलीच लुबाडणूक केली. बेस्ट बस रस्त्यावरून गायब झाल्याचे उमजताच चलाख रिक्षा आणि टॅक्सी चालक बस थांब्याच्या आसपास घुटमळू लागले. जवळचे भाडे नाकारत ही मंडळी दूर जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रतीक्षेत होती. यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांशी प्रवाशांचे खटके उडत होते.
अनेक शाळांच्या सध्या परीक्षा सुरू आहेत. बेस्ट बस नसल्याने परीक्षेची वेळ चुकू नये यासाठी दुप्पट-तिप्पट भाडे देऊन रिक्षा आणि टॅक्सीतून विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागली. बेस्ट प्रशासन आणि चालक-वाहकांचा वाद आणि रिक्षा-टॅक्सी चालकांची मुजोरी यामुळे मुंबईकरांना मंगळवारी दिवसभर मन:स्ताप सहन करावा लागला. संध्याकाळपर्यंत बेस्ट प्रशासन आणि चालक-वाहकांमध्ये तडजोड होऊ न शकल्याने कार्यालयातून घरी पोहोचण्यासाठी टँक्सी-रिक्षाच्या भाडय़ाचा भरुदड सोसावा लागला.