घरोघरी गोळा होणाऱ्या रद्दीतून वसतिगृह कार्यान्वित झाले, एका गरीब हृदयरोगी महिलेवर उपचार सुरू आहेत. ‘डोनेट टू एज्युकेट’ ही कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे ‘दान परोमिता’ या सामाजिक संस्थेने.
‘दान परोमिता’ ही संस्था म्हणजे दानशुरांचे व्यासपीठ (डोनर्स प्लॅटफॉर्म) आहे. भंते डॉ. मेत्तानंद चिंचाल, भंते सदानंद, डॉ. विलास डांगरे, अविनाश संगवई, समाज वंचितांची कमालीची कळकळ असलेले नागेश पाटीलआदी अनेक मंडळी या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी आहेत. अविनाश संगवई हे ‘सक्षम’ या अंध व नि:समर्थाच्या उत्थानासाठी कार्यरत संस्थेचेही पदाधिकारी आहेत. अकोला येथील एका महिलेच्या हृदयाचा व्हॉल्व निकामी झाला होता. तेव्हा त्या महिलेला औषधोपचारासाठी साडेतीन हजार रुपये आणि तज्ज्ञ डॉक्टरांकरवी उपचार करण्यात आले. औषधोपचारासाठी तिला अद्यापही मदत दिली जात आहे. तिची मुलगी नागपूरला शिकत होती. तिच्या पाच-सात मैत्रिणींना मदत करताना ‘दान परोमिता’ संस्थेची कल्पना पुढे आली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राची विद्यार्थ्यांना ओळख व नंतर लेखी परीक्षा घेण्यात आली. पावणेदोन लाख विद्यार्थी या परीक्षेस बसले होते.
असा आहे प्रकल्प
सामान्य माणसाच्या दानातूनही मोठे कार्य उभे राहू शकते. याची प्रचिती या रद्दी प्रकल्पातून आली. रद्दी दान देऊ इच्छिणाऱ्याजवळ व संस्थेजवळ एक कार्ड असते. दर महिन्याला संस्थेचे वाहन एका कार्यकर्त्यांसह दानशुराच्या घरी जाते. कार्यकर्ता व दान करू इच्छिणाऱ्याजवळील अशा दोन्ही कार्डावर नोंद केली जाते. एक गिरणी ही रद्दी दहा रुपये किलोप्रमाणे ती खरेदी करते. रद्दी विक्रीतून आलेली रोख रक्कम संस्थेच्या बँक खात्यात जमा होते. त्यातून गरजूंना मदत केली जाते.
सर्वसामान्यांनी दान केलेल्या रद्दीतून उत्तर नागपुरात एक मुलींचे वसतिगृह सुरू झाले आहे. ‘वसुंधरा चॅरिटेबल सोसायटी’च्या माध्यमातून हे वसतिगृह सध्या भाडय़ाने घेतलेल्या चार खोल्यांमध्ये सुरू असून सध्या तेथे वीस मुली आहेत. त्यांचे शिक्षण, चहा, नाश्ता, भोजन, कपडे यासाठी दर महिन्याला ५० हजार रुपये खर्च आहे.  
रद्दी अथवा कुठलेही दान देऊ इच्छिणाऱ्यांनी डॉ. अविनाश संगवई यांना भ्रमणध्वनी ९९२२४०७१९०वर संपर्क साधावा. भावनात्मक, कौशल्य अथवा वस्तुरुपी अशा कुठल्याही प्रकारे दान करू शकता.
कुणाला वाढदिवस या मुलांसह साजरा करायचा असतो वगैरे हे भावनात्मक दान. कौशल्य म्हणजे कौशल्य अथवा ज्ञानाचा उपयोग वंचितांच्या अथवा गरजूंच्या मदतीसाठी करणे. सर्वसामान्यांनी दिलेल्या रद्दीच्या दानातून ‘दान परोमिता’ने बुटीबोरीमधील दादा बनकर संचालित कृतज्ञता वसतिगृह, हुडकेश्वर मार्गावरील डॉ. रामटेके संचालित विजया परिवारास मदत देऊ केली आहे.