एखाद्या महिलेला मूल आणि करिअर यातून एकाचीच निवड करायला भाग पाडणे वा त्यासाठी दबाव टाकणे म्हणजे तिचे करिअर धोक्यात घालण्यासारखे तसेच पालक म्हणून तिला तिच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्यासारखे आहे, असे स्पष्ट करत संशोधनाच्या निमित्त परदेशात वास्तव्यास असलेल्या महिलेची १३ वर्षांच्या मुलीला ताब्यात देण्याची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली. महिलेने मुलाऐवजी करिअर निवडले या कारणास्तव तिला तिच्या पालक म्हणून असलेल्या अधिकारांपासून वंचित ठेवता येऊ शकत नाही, असेही न्यायालयाने या वेळी नमूद केले. 

न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. डॉक्टर असलेली ही महिला पतीशी काडीमोड घेतल्यानंतर मे २००८ मध्ये कर्करोगाच्या संशोधनासाठी डेन्माकला गेली. त्यावेळेस परस्पर संमतीने तिने मुलीला पतीकडे ठेवण्याचा परवानगी दिली. परंतु मुलीला जेव्हा भेटावेसे वाटेल तेव्हा भेटण्याची अटही घातली. पुढे तिच्या पतीने दुसरे लग्न केले. दरम्यानच्या काळात ही महिला डेन्मार्कमध्ये आपल्या कर्करोगाच्या संशोधनात व्यग्र असताना तिच्या मुलीने तिला ई-मेल करून आपल्याला तुझ्यासोबतत राहायचे असल्याचे सांगितले. मुलीच्या या ई-मेलनंतर जराही वेळ न दवडता ही महिला भारतात परतली आणि तिने मुलीला ताब्यात देण्यात यावी अशी विनंती कुटुंब न्यायालयाकडे केली. सुनावणीदरम्यान मुलीला समुपदेशकाकडे पाठविण्यात आले. तेथेही तिने आपल्याला आईसोबत राहायचे असल्याचे सांगितले. मात्र संबंधित मुलगी भावनेच्या भरात ही इच्छा व्यक्त करत आहे आणि ती ग्रा’ा मानून तिच्या सर्वस्वी कल्याणाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे नमूद करत कुटुंब न्यायालयाने महिलेची मागणी फेटाळून लावली. त्या विरोधात या महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळेसही न्यायालयाने मुलीचे म्हणणे जाणून घेतले. तिच्याशी झालेल्या बोलण्यातून ती स्वत:चे निर्णय घेण्याएवढी सजाण आहे, असे नमूद करत न्यायालयाने महिलेला तिच्या १३ वर्षांच्या मुलीचा ताबा दिला. दरम्यान, आपली मुलगी जन्मल्यापासून येथेच तिला येथील वातावरणाची सवय आहे आणि परदेशातील वातावरणात ती जुळवून घेऊ शकणार नाही. तिच्या सर्वागीण विकासावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. त्यामुळे तिला तिच्या आईच्या ताब्यात देऊ नये, अशी मागणी महिलेच्या पतीने केली होती. परंतु तरुण पिढी पटकन परिस्थितीशी जुळवून घेते, असे नमूद करत न्यायालयाने पतीची मागणी फेटाळून लावली.