साईबाबांच्या मंदिरात भाविकांना फुलांचे हार, पुष्पगुच्छ, प्रसादाचे पेढे, नारळ नेण्यास बंदी घालण्याचा निर्णय संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने घेतला आहे. या अन्यायकारक निर्णयाचा फेरविचार करून भाविकांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी संस्थानचे त्रिसदस्यीय अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश जयंत कुलकर्णी आणि समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाकरिता देश-विदेशातून कोटय़वधी भाविक येतात. येथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा व भावना फुलांचे हार, पुष्पगुच्छ, नारळ, प्रसादाचे पेढे यात गुंतलेली असते. सुरक्षा यंत्रणेच्या तपासणीनंतरच पूजेचे साहित्य मंदिरात नेले जात असताना या साहित्यावर बंदी आणल्याने हा निर्णय कोटय़वधी साईभक्तांच्या भावनांशी खेळण्याचा होईल, शिवाय परिसरातील हजारो शेतकरी व छोटे छोटे विक्रेत्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या निर्णयाचा फेरविचार करून भाविक व विक्रेत्यांना दिलासा द्यावा अशी विनंती विखे यांनी केली आहे.