‘निर्माण’च्या युवकांना डॉ. अभय बंग यांचा गुरूमंत्र
आयोजनापेक्षा प्रयोजनाने प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. जगण्यासाठी काही स्वप्न पाहिजे, प्रयोजन पाहिजे, पण या जगण्याचे काय करू?, जगण्याचे प्रयोजन काय? हेच युवकांपुढील आज मोठे आव्हान आहे, असे विचार ‘सर्च’चे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.
सामाजिक संस्था ‘निर्माण’च्या नागपूर गटातर्फे जागतिक युवक दिवसानिमित्त रविवारी साई सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘पुढील दहा वर्षे आणि युवकांसमोरील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. बंग बोलत होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून  ‘निर्माण’च्या युवकांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
राज्यात काही ठिकाणी युवक रेव्ह पार्टीत व्यस्त होतात, ही युवा संस्कृती प्रेरणादायी नाही, पण नागपुरात नवे चित्र विकसित होत आहे. येथील ६० युवकांचा निर्माण गट गेल्या वर्षभरापासून उमळत्या उत्साहाने काम करीत आहे. सध्याच्या १८ ते २८ या वयोगटातील युवकांसमोर स्वत:चे जीवन हेच सर्वात मोठे आव्हान आहे. १९६३ च्या युवकांसमोर नोकरी सर्वोच्च स्वप्न होते. आजच्या युवकांचे स्वप्न वेगळे आहे. आजच्या युवकांची स्वप्ने ही उद्याची आहेत. युवक मोठी स्वप्ने बघत आहेत. युवक हेच ‘सुपर पॉवर’ आहेत. या जगण्याचे काय करू?, हा खरा प्रश्न असला तरी काहीही करा पण मूठभर पैशासाठी आयुष्य विकण्याचा मूर्खपणाचा सौदा करू नका. आयोजनापेक्षा प्रयोजनाने प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. निव्वळ पैशासाठी आयुष्य विकणार नाही, असा संकल्प करा, असे आवाहन डॉ. बंग यांनी केले.
भांडवलशाहीचे पाप, पृथ्वीला आलेला ताप आणि धार्मिक हिंसाचाराचा शाप हे तीन प्रश्न युवकांसमोर उभे आहेत. कर्तव्य म्हणजेच स्वधर्म. आज निर्माणच्या नागपूर गटाचे युवक जगण्याचे प्रयोजन बाहरेच्या जगात शोधत आहेत. एक प्रश्न सोडविणे हा जीवनातील सर्वात उज्ज्वल क्षण असतो. ‘एक माणूस एक मिशन’ हे ध्येय ठेवा. प्रश्न दिसतात, ते पाहिले पाहिजे, हाक कानी पडते, ती ऐकली पाहिजे आणि अवतीभवती असलेले दु:ख पाहिले पाहिजे. इच्छांना अंत नसल्याने गरजा मर्यादित ठेवणे आज हिताचे आहे. हवे ते न मिळणे आणि पाहिजे ते मिळणे या दोन शोकांतिका आहेत. पयोजन स्वीकारण्यासाठी गरजा मर्यादित ठेवा आणि आपल्या कर्तृत्वाने जग बदलून जाईल, असे वाटले पाहिजे. जीवन हेच शिक्षण आहे. ते सरळसरळ जीवनाशी जोडले गेले पाहिजे. एखादे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न तर सुरू करा, ‘करून तर पाहा’ असा हितोपदेश असे डॉ. बंग यांनी दिला. तत्पूर्वी, निर्माणच्या कार्याचा आढावा रंजन पांढरे यांनी घेतला. निर्माणच्या माध्यमातून राज्यातील अस्वस्थ युवकांनी समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांचा कृतिशील शोध घ्यावा यासाठी शिक्षण प्रक्रिया सुरू केली आहे.