आगरी-कोळी समाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत विखुरलेला आहे. मात्र या समाजाच्या लग्नसोहळ्यातील साखरपुडा, हळद यांसारख्या समारंभात मद्य, मटण तसेच मानपानाच्या अनाठायी खर्चाला विरोध करण्यासाठी नवी मुंबईतील प्रत्येक गावागावांतून जनजागृती करणे आवश्यक असून गावातील लोकांनी आजपासून या समाजातील हळद, साखरपुडा आणि इतर कार्यक्रमांत होणारा अनाठायी खर्च कमी करण्यासाठी सज्ज होऊ या असा समाजहिताचा निर्णय अखिल आगरी समाज परिषदेमध्ये घेण्यात आला. रविवारी नेरुळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवन येथील सभागृहात रविवारी एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, नगर इत्यादी जिल्ह्य़ांतून आगरी समाज बांधव आले होते.
या वेळी आगरी-कोळी समाजात लग्नकार्यातील हळद, साखरपुडा समारंभात दिल्या जाणाऱ्या मटण, मद्याला तीव्र विरोध करणे, गरजेपोटी प्रकल्पग्रस्तांनी गावठाणाबाहेर बांधलेली सर्व घरे नियमित करावी, भूमिपुत्रांच्या बेरोजगार तरुणांना महापालिका आणि सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची मागणी, नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अंधश्रद्धा, अनिष्ट धार्मिक रूढी व कालबाह्य़ झालेल्या परंपरा बंद कराव्यात, निधनानंतर १३ व्या दिवशी दुखवटा कार्यक्रमात सोनसाखळीसारख्या भेटवस्तू देण्यावर र्निबध घालावा, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे विनापरवाना नियमित करणे व सिडकोच्या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने फायद्याचे होत नसले तर विरोध करावयाचा अशा विविध विषयांवर सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने शिक्कामोर्तब करण्यात आला. या वेळी नवी मुंबईतील २९ गावांच्या दोन हजार भूमिपुत्रांनी या बैठकीस हजेरी लावली. याप्रसंगी खासदार कपिल पाटील, आमदार सुभाष भोईर, आमदार मनोहर भोईर, संघटनेचे अध्यक्ष श्याम म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.