महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उपराजधानीतील सर्वात मोठा महोत्सव असे वर्णन केले जात असलेला ‘उपवन आर्ट फेस्टिव्हल’ आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून ठाणेकर त्याला कसा प्रतिसाद देताहेत याबाबत उत्सुकता आहे. इतर महोत्सवांप्रमाणेच संगीत हे या फेस्टिव्हलचे ठळक वैशिष्टय़ असून पहाट आणि सायंकालीन मैफलींमध्ये तब्बल सहा व्यासपीठांवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत १० ते १२ जानेवारी दरम्यान पहाट आणि सायंकालीन मैफलींमध्ये आपली कला सादर करणार आहेत. अर्थातच उस्ताद झाकीर हुसेन हे या महोत्सवाचे खास आकर्षण आहे. गेली काही वर्षे किमान एकदा तरी झाकीर हुसेन यांच्या तबल्याची जादू अनुभवण्याची संधी ठाणेकरांना लाभते. यंदा महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी संध्याकाळच्या संगीत मैफलीत विख्यात मेंडोलिन वादक यू. श्रीनिवासन आणि खंजिरा या वैशिष्टय़पूर्ण वाद्यावर प्रभुत्व मिळविलेले व्ही. सेल्व्हा गणेश यांच्यासोबत उस्तादजींची जुगलबंदी ऐकण्याचा योग जुळून आला आहे.
शनिवारी सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत सुप्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड भक्तिगीते सादर करणार आहेत. संध्याकाळी पहिल्या सत्रात रजनी आणि गायत्री या कर्नाटक संगीतातील सध्याच्या लोकप्रिय गायिका आपली कला सादर करणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या सत्रात उत्तर भारतीय संगीतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक रशिद खान यांचे गाणे होईल.  रविवारी सकाळच्या सत्रात साडेसहा वाजता पश्चिम बंगालमधील लोकप्रिय गायिका पार्वथी बौल यांचे गाणे होईल. शांतिनिकेतनमध्ये शिकलेल्या पावर्थी बौल उत्तम चित्रकार आणि कथाकथनकारही असून उपवन आर्ट महोत्सवात त्या भक्तिगीते सादर करणार आहेत. याच मैफलीच्या दुसऱ्या सत्रात मध्य प्रदेशमधील लोकप्रिय गायक प्रल्हाद टिपनिया पारंपरिक वाद्यांच्या साथीने कबिराची भजने सादर करणार आहेत. पहिल्या सत्रात रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता किराणा घराण्याचे लोकप्रिय गायक जयतीर्थ मेवुंडी यांचे शास्त्रीय गायन होईल तर महोत्सवातील सांगीतिक मैफलींची सांगता एल. सुब्रमण्यम याच्या व्हायोलिन वादनाने होईल.