मोबाइलवर अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला इंटरनेटचे काही दर भरावे लागतात. पण जर अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर तुम्हाला टॉकटाइम मिळत असेल तर. हो हे खरे आहे. आपले अ‍ॅप जास्तीत जास्त डाऊनलोड व्हावेत यासाठी अनेक कंपन्या आणि ‘फ्री रिचार्ज अ‍ॅप’ची ऑफर देत आहेत.
अँड्रॉइड अ‍ॅप स्टोअरवर अशा ‘फ्री रिचार्ज अ‍ॅप’चा चांगलाच बोलबाला आहे. अनेक महाविद्यालयील विद्यार्थी 53या अ‍ॅपच्या माध्यमातून रिचार्ज करतात आणि आपला पॉकेटमनी वाचवतात. यामध्ये अगदी दोन रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंतचे रिचार्ज देणारे अ‍ॅप्स उपलब्ध आहे. व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय म्हणून सुरू करण्यात आलेल्या भारतीय संदेशवहन अ‍ॅप ‘हाईक’ने हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला आपल्या मित्रांना देणाऱ्यांना दहा ते वीस रुपयांचा टॉकटाइम देऊ केला होता. यानंतर अशा प्रकारच्या अ‍ॅप्सची संख्या चांगलीच वाढली आहे. काही कंपन्या आपले अ‍ॅप डाऊनलोड व्हावे या उद्देशाने ही सुविधा देत आहेत तर काही कंपन्या लाखो मोबाइलधारकांची माहिती मिळवण्यासाठी ही शक्कल लढवीत आहेत. यामध्ये ‘पॉकेट’ नावाचे एक अ‍ॅप असून ते विद्यार्थ्यांना सर्वाधिक फायदा मिळवून देते. हे अ‍ॅप आपण डाऊनलोड केल्यावर यामध्ये आपल्याला विविध कंपन्यांचे सर्वेक्षण पाहवयास मिळतात. हे सर्वेक्षण आपण भरून दिले की आपल्याला एक ते पाच रुपयांपर्यंतचा टॉकटाइम मोफत मिळतो. इतकेच नव्हे तर जर हे अ‍ॅप आपण आपल्या मित्रांना सुचविले आणि त्यांनी ते डाऊनलोड केले की आपल्याला पाच रुपयांचा टॉकटाइम नक्की मिळतो. अशा प्रकारे महिन्याला पाचशे रुपयांपर्यंतचे टॉकटाइम मिळवलेल्यांची उदाहरणेही आहेत. अशाच प्रकारे ‘फ्री प्लस’ नावाचे एक अ‍ॅप आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या ऑफर्स पूर्ण करून वीस रुपयांपर्यंत टॉकटाइम मिळवता येऊ शकतो. तसेच हे अ‍ॅप आपण मित्रांना सुचविले तर त्याचेही सात रुपये आपल्याला खात्यात जमा होतात.
तुम्हाला सर्वेक्षण किंवा ऑफर्स देणारे अ‍ॅप घेऊन टॉकटाइम वाढवायचा नसेल तर काही असेही अ‍ॅप्स आहेत की जे तुम्ही डाऊनलोड केल्यावर थेट टॉकटाइम देतात. यामध्ये स्नॅपडीलचे अ‍ॅप तीन रुपये देते, तर क्विकरचे अ‍ॅप दोन रुपये, जबाँगचे अ‍ॅप दोन रुपये आपल्या प्रीपेड खात्यात जमा करतात. या सर्व अ‍ॅपसनी विविध मोबाइल कंपन्यांची सामंजस्य करून या सुविधा देऊ केल्या आहेत. या सुविधा प्री-पेड ग्राहकांसाठी असून हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी आपण वापरत असेलेली मोबाइल नेटवर्क सेवा पुरविणारी कंपनी या अ‍ॅपच्या ‘फ्री रिचार्ज’ यादीत आहे की नाही हे तपासून घ्या.