सामुदायिक बुद्धवंदना, अभिवादन सभा, व्याख्यान, प्रतिमा पूजन, निबंध स्पर्धा आणि भव्य मिरवणूक.. अशा विविध उपक्रमांनी सोमवारी उत्तर महाराष्ट्रात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख रस्ते, चौकात लावलेल्या शेकडो झेंडय़ांमुळे वातावरण निळेमय झाले होते. सायंकाळी नाशिकसह इतरत्र मिरवणुकीस उत्साहात सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उमेदवारांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावून प्रचार करण्याची संधी साधून घेतली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्था-संघटनांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. नाशिकसह धुळे व जळगाव शहरात ठिकठिकाणी आकर्षक रोषणाईने व्यासपीठ सजविण्यात आले. मध्यरात्री शिवाजी रस्त्यावरील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी लोकसभेचे बहुतांश उमेदवार, सर्वपक्षीय पदाधिकारी व भीमसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवारी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंदा जयंती सोहळ्यावर लोकसभा निवडणुकीचे सावट पहावयास मिळाले. राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी ठिकठिकाणी हजेरी लावली.
क्रांतिसूर्य महात्मा फुले व विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त पंचवटीतील विडी कामगार वसाहतीत व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. दिगंबरनगर येथे शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. सिद्धार्थ मित्र मंडळातर्फे गांधीनगर येथे तर संजय साबळे युवा फाऊंडेशनतर्फे आडगाव येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
नाशिकरोड व देवळाली कॅम्प भागात आंबेडकर जयंतीचा वेगळाच उत्साह असतो. संपूर्ण परिसर निळ्या झेंडय़ांनी व आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला होता. देवळाली कॅम्प येथे पंचशील ध्वजारोहण, शोभायात्रा व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसे, शिवसेना पक्षांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. बाल विद्या प्रसारक मंडळ संचालित आदर्श सेकंडरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. यानिमित्त सामाजिक विषयांवर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष विनोद कपूर, व्ही. एच. पाटील, उदय कुलकर्णी, मुख्याध्यापिका शुभांगी बेलगांवकर उपस्थित होते.
नाशिकसह धुळे व जळगाव जिल्ह्यात अभिवादन सोहळा, प्रतिमा पूजन आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव शहरात रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. आंबेडकर यांचा पुतळा हे उत्सवाचे मुख्य केंद्र असते. हा संपूर्ण परिसर सजविण्यात आला होता. धुळे शहरात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करण्यात आले. जागोजागी कमानी, स्वागतफलक, विद्युत रोषणाई, पताका आणि झेंडे लावण्यात आल्याने व भीमगीतांच्या सुरांनी वातावरण भारावलेले होते. नाशिक शहरातील मुख्य मिरवणुकीस मोठा राजवाडा भागातून सायंकाळी प्रारंभ झाला. विविध संकल्पनांवर आधारलेले चित्ररथ, ‘जय भीम’चा उल्लेख असणारे टी-शर्ट, रिबिन्स व टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते मिरवणुकीत
सहभागी झाले. मिरवणुकीसही उमेदवारांनी हजेरी लावली.