विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीबाबतचा निर्णय अंधातरी असला तरी काँग्रेसने मात्र विदर्भातील काही मतदारसंघात नावे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काँग्रेसच्या संसदीय मंडळाने उत्तर नागपुरातून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पश्चिममधून विकास ठाकरे आणि दक्षिण पश्चिममधून प्रफुल्ल गुडधे पाटील यांची नावे पाठविली. मध्य, पूर्व आणि दक्षिण मतदारसंघातून अनेक इच्छुक दावेदारांची नावे संसदीय मंडळाकडे असल्यामुळे माजी मंत्री अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी आणि दीनानाथ पडोळे यांना उमेदवारी मिळेल की नाही, हे सध्या तरी अनिश्चित आहे.
काँग्रेसमध्ये गेल्या आठ दिवसांपासून इच्छुकांच्या मुलाखती सुरू असून विदर्भातील अनेक इच्छुकांनी मुंबईत ठाण मांडले आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्य़ात उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू असताना प्रत्येक जण आपापल्या गॉडफादरच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. पश्चिम नागपुरातून विकास ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. विद्यमान मंत्री आणि आमदारांच्या नावाच्या छाननी समितीला शिफारस करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. त्यानंतर उमेदवारी निश्चिती संदर्भात काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकींचा जोर सुरू आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक पश्चिममधून आग्रही असले तरी त्यांना स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून विरोध होत आहे. मुळक यांना उमेदवारी दिली जात असेल तर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात द्यावी, असा आग्रह संसदीय मंडळाच्या बैठकीत धरण्यात आला आहे.
दक्षिणमधून दीनानाथ पडोळे यांचे नाव सध्या आघाडीवर असले तरी या मतदारसंघातून गिरीश पांडव, अभिजित वंजारी यांची नावे समोर आली आहेत. माजी मंत्री अनिस अहमद यांनी मध्य आणि सतीश चतुर्वेदी यांनी पूर्वमधून उमेदवारी मागितली असून त्यांच्या नावाची संसदीय मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, या दोन्ही नेत्यांना विरोध केला जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अनिस अहमद मध्यमधून पश्चिममध्ये गेले आणि त्या ठिकाणी पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांना यावेळी मध्यमधून उमेदवारी देऊ नका, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांंकडून केली जात आहे. अहमद यांच्याशिवाय आशिफ कुरेशी आणि डॉ. राजू देवघरे यांचे नाव समोर आले आहे. उत्तर नागपुरात नितीन राऊत यांचे नाव जवळपास निश्चित असले तरी त्यांना पक्षातूनच विरोध होत आहे. राजा द्रोणकर यांनी त्यांच्या विरोधात अनेक दिवसांपासून मोहीम सुरू केली आहे. दक्षिण-पश्चिममधून प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्या नावाची संसदीय मंडळाने  शिफारस केली आहे. या मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे प्राबल्य असल्यामुळे काँग्रेसकडून फारसे कोणी इच्छुक निवडणूक लढण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.
पूर्वमध्ये सतीश चतुर्वेदी यांना त्यांच्या समर्थकांकडून विरोध केला जात आहे. तानाजी वनवे, नरेश गावंडे आणि अभिजित वंजारी यांची नावे संसदीय मंडळासमोर आली आहेत. नवीन कार्यकर्त्यांंना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला तर काँग्रेसच्या या रस्सीखेचमध्ये अनिस अहमद आणि चतुर्वेदी यांचे नाव मागे पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे माजी खासदार विलास मुत्तेमवार शहरात आपले वर्चस्व असावे व आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत. तुर्तास तरी संसदीय मंडळाने उमेदवारांच्या नावाची शिफारस केली असली दिल्लीवरून कोणाच्या नावाचा लिफापा येतो, हे लवकरच समोर येईल.