शहरातील मधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवले गेले आहे. डॉ. गुप्ता व त्यांच्या चमूने ‘डायबिटीक न्यूरोपॅथी स्क्रिनिंग’चा जागतिक विक्रम केला आहे.
१४ नोव्हेंबर २०१३ रोजी त्यांच्या धंतोलीतील डायबिटीज केअर अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत १०० रुग्णांची न्यूरोपॅथी स्क्रिनिंग करण्यात आली. इतर दिवशी फक्त दहा ते बारा स्क्रिनिंग होतात. या स्क्रिनिंगचे व्हिडिओ रेकॉर्डिग करण्यात आली. यावेळी गिनीज बुकचा प्रतिनिधीही उपस्थित होता. सर्व माहिती गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डच्या कार्यालयाल्या पाठवण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच वल्र्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे त्यांना पत्र प्राप्त झाले. नागपुरातील वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल प्रथमच एका डॉक्टरला असा बहुमान मिळाल्याचा दावा डॉ. सुनील गुप्ता यांनी केला.
मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या शरीरावर परिणाम होत असतो. विशेषत पाय दुखणे, जळजळ होणे, पायातून चप्पल निघणे, थंड व गरम पाणी याची जाणीव न होणे, अशी लक्षणे न्यूरोपॅथीमध्ये दिसून येतात. यासाठी तळपायाची न्यूरोपॅथी स्क्रिनिंग करण्यात येते. या तपासणीद्वारे किती प्रमाणात मधुमेह आहे, याची माहिती मिळते. अशी लक्षणे दिसताच स्क्रिनिंग करून उपचार सुरू केल्यानंतर पायाला होणारे इन्फेक्शन व गँगरीनपासून वाचवणे शक्य होते. यामध्ये आपण ७० ते ८० टक्के पाय कापण्यापासून वाचवू शकतो. आपल्या चेहऱ्याप्रमाणेच पायाची सुद्धा काळजी घ्यावी. त्यासाठी दरवर्षी एकदा डायबिटीज न्यूरोपॅथी स्क्रिनिंग करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. हा बहुमान मिळाल्याचे श्रेय आई-वडील सरोज गुप्ता व एस.पी. गुप्ता, पत्नी कविता गुप्ता, सहयोगी डॉ. सरिता उगेमुगे, डॉ. अजय अंबाडे व रुग्णालयातील सर्व सहकाऱ्यांना दिले आहे.