दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी ३० जुलै ते १ ऑगस्टदरम्यान डॉ. वसंतराव देशपांडे संगीत समारोह आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात आजपर्यंत स्थानिक कलाकारांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नामवंत गायक, वादक कलावंतांनी हजेरी लावली आहे. यावर्षी अनेक नामवंत कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती केंद्राचे संचालक डॉ. पीयूष कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तीन दिवस होणाऱ्या या संगीत महोत्सवात यावर्षी हिंदुस्तानी आणि कर्नाटक संगीत शैलीचा समावेश करण्यात आला आहे. कर्नाटक शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम फार कमी ऐकायला मिळतात. त्यामुळे यावर्षी दक्षिणात्य मान्यवर कलावंत हजेरी लावणार आहेत. गेल्या काही वर्षांत लुप्तप्राय होत चाललेल्या धृपद गायन प्रकार यावेळी सादर होणार आहे. ३० जुलैला उद्घाटन कार्यक्रमात डॉ. वसंतराव देशपांडे युवा संगीत स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. त्यानंतर पंडित रोणु मुजुमदार (बासरी) आणि बी जयश्री (शास्त्रीय गायन) यांची जुगलबंदीचा आस्वाद रसिकांना मिळणार आहे. त्यानंतर पंडित राजन-साजन मिश्रा यांचे शास्त्रीय गायन होईल. ३१ जुलैला गुंदेचा बंधू यांचे धृपद गायन होईल. १ ऑगस्टला गणेश व कुमरेश (व्हायोलिन जुगलबंदी कर्नाटक शैली) आणि त्यानंतर ज्येष्ठ शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांचे शास्त्रीय गायन होईल.
तीन दिवस होणाऱ्या संगीत समारोहासाठी नाममात्र शंभर रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. या निधीचा उपयोग लोक व आदिवासी कलावंतांच्या मदतीसाठी देणार आहे. कार्यक्रमाच्या प्रवेश पत्रिका केंद्राच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहणार आहेत. रसिकांनी या संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला दीपक कुळकर्णी उपस्थित होते.  

गायन व वादन स्पर्धा
या महोत्सवाच्या निमित्ताने वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिनिमित्त २७ ते २९ जुलैदरम्यान युवा कलावंतांसाठी हिंदुस्थानी व कर्नाटक शास्त्रीय संगीत गायन व वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या चार झोनमधील युवा कलावंत सहभागी होणार आहेत. प्राथमिक फेरी होऊन त्यातून अंतिम फेरीसाठी स्पर्धक निवडले जाणार आहेत. अंतिममधून आठ स्पर्धकांची निवड केली जाणार आहे. निवड केलेल्या आठ गायकांना देशभरात गायनाची संधी देण्यात येणार आहे. शिवाय पुढील वर्षी होणाऱ्या वसंतराव देशपांडे स्मृती समारोहात त्यांचे गायन होईल. प्रथम पारितोषिक ५१ हजार तर दुसरे पारितोषिक ३१ हजार रुपयांचे असून प्रत्येकी चार कलावंतांना ते देण्यात येणार आहे. ३० तारखेला गायकांना पुरस्कार देण्यात येईल, असे डॉ. पीयूषकुमार यांनी सांगितले.