नागपूर केंद्रावर सुरू असलेली ५४ वी हौशी मराठी राज्य नाटय़ स्पर्धा हाताळल्या जाणाऱ्या वैविध्यपूर्ण विषयांमुळे रंगतदार आणि वैशिष्टय़पूर्ण ठरली आहे. प्रत्यक्ष नाटकांचे यशापयश या पलीकडे जाऊन निरनिराळे विषय हाताळण्याचे धाडस लेखक आणि नाटय़कर्मीनी या स्पध्रेत यशस्वीपणे करून दाखविले आहे.
लावणी कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या नाटकांवर आधारित ‘विठाबाई’, राजन खान यांच्या कथेवर आधारित ‘डहुळ’ असो किंवा श्याम पेठकर यांच्या ललितबंधावर आधारित ‘ऋतुस्पर्श’ असेल. चांगले दमदार विषय या स्पध्रेत हाताळले गेले. विठाबाईंच्या आयुष्यातील संघर्षांला संजय जीवने यांनी ‘विठाबाई’ नाटकाच्या मूळ लिखाणातच ताकदीने मांडले व त्यामुळे प्रत्यक्ष प्रयोगादरम्यान प्रेक्षकही नाटकाशी एकरूप होताना आढळून येत होते. इंदूरच्या नाटय़ भारती संस्थेने सादर केलेले ‘डहुळ’  हे नाटक या स्पध्रेचा आतापर्यंतचा सर्वोच्च बिंदू ठरले आहे. या नाटकाचा प्रयोग प्रेक्षकांना प्रचंड प्रमाणात आवडला याचे श्रेय जितके सादरीकरणाला तेवढेच किंवा कदाचित जास्तच नाटकाच्या लिखाणाला होते. स्पध्रेत सादर करावयाच्या नाटकासाठी तात्विक विषय आवर्जून निवडणे आणि तो प्रेक्षकांना दुबरेध न वाटता त्यांच्यापर्यंत पोचविणे, हे आव्हान असते. श्रीराम जोग यांनी राजन खान यांच्या कथेचे नाटय़ रूपांतर करताना हे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे.  
श्याम पेठकर यांच्या ‘ऋतुस्पर्श’ ललितबंधाचे नाटय़ रूपांतर करणे हे निश्चितच आव्हान होते. राज्य नाटक स्पध्रेकरिता या विषयावर नाटक लिहून पत्रकार-लेखक नितीन नायगावकर यांनी हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला. ऋतूंचा अमूर्त सौंदर्याविष्कार मांडताना नायगावकर यांनी भाषेचे सौंदर्य अत्यंत चांगल्या प्रकारे तर जपले आहेच शिवाय ऋतूबदलातील नाटय़ लेखनातून प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्नही दाद देण्याजोगा होता.
मुस्लिम समाजातील सामान्य माणसाचे विश्व मांडणा-या ‘कमेला’ नाटकाचा विषयही तसा अनवट वाटेने जाणारा होता. विषयाची मांडणी करताना मुस्लिम समाजाच्या रोजच्या जगण्यातील लहान-सहान गोष्टी सलीम शेख यांनी प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे ठेवल्या.  ‘हिटलर कर आधी मौत’ किंवा ‘तो एक उंबरठा’ हे ऐतिहासिक संदर्भ मांडणारे विषयही प्रेक्षकांना रुचले व त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेत पारितोषिक जिंकण्यासाठी पूर्वी यशस्वी ठरलेले ठराविक विषय, रूढ साचे या पलीकडे जाऊन वेगळे विषय सादर करण्याच्या लेखकांचा प्रयत्न या स्पध्रेत दिसून आला. प्रयोग संपेपर्यंत कायम राहणारी गर्दी आणि नाटकांदरम्यान मिळणारा प्रतिसाद यामुळे प्रेक्षकांनाही हे वेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न आवडत असल्याचे सिद्ध झाले आहे.
‘सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा’
रस्त्यावर फिरणारे हे मनोरुग्ण समाजासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी आव्हान आहे. मनोरुग्ण हे दोन प्रकारचे असतात. त्यातील एका प्रकारात या रुग्णांना वेडाचे झटके येतात. त्याला ‘स्किझोफ्रेमिया’ असे म्हणतात. असे लोक वेगळ्या विश्वात रमतात. त्यांचे शरीराकडे व अन्य कोणत्याच बाबीकडे लक्ष राहात नाही. वेडाचा झटका आला की ते घरातून निघून जातात. महिनोमहिने फिरत असतात. अशा रुग्णांवर वेळेवर औषधोपचार झाले तर ते निश्चितच बरे होऊ शकत असल्याची माहिती शहरातील प्रसिद्ध मानसिकरोग तज्ज्ञ डॉ. शैलेश पानगावकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. असाच एक वेडा दुपारी आमच्या घराजवळ येऊन बसायचा. त्याला आम्ही दररोज जेवण देत असे. त्याला जेवणात सतत औषध देत असायचो. तीन आठवडय़ानंतर त्याच्यामध्ये सुधारणा झाली. त्याने नंतर आपण जळगावमध्ये राहणारा असल्याचे सांगितले, अशी आठवणही त्यांनी सांगितली. तात्पर्य, अशा रुग्णांवर त्याच्या कुटुंबाने किंवा समाजाने लक्ष दिले तर ते निश्चितच बरे होतात. पण त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाही, हाच खरा प्रश्न आहे. अशा रुग्णांसाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे. परंतु न्यायालयीन अडचणीची प्रक्रिया आणि केअर टेकर न मिळणे, यामुळे मनोरुग्णांकडे या संघटना लक्ष देत नसाव्यात, असे भाष्यही डॉ. पानगावकर यांनी केले.