संजय पवार यांचं एकूणच लेखन विद्रोही, बंडखोर तसंच अन्याय्य गोष्टींवर मार्मिक आणि घणाघाती आघात करणारं असतं. चमत्कृतीयुक्त, पण अत्यंत तर्कसंगत व बुद्धिगामी मांडणी, प्रखर सामाजिक-राजकीय भान, मूर्तिभंजनाची खुमखुमी, त्यापायी लागणारा वरचा सूर.. ही त्यांच्या शैलीची काही वैशिष्टय़ं! मुख्य धारा रंगभूमीला हे झेपणं मुश्कीलच. त्यामुळेच असेल बहुधा, व्यावसायिक रंगभूमीनं त्यांना कधी आपलं म्हटलं नाही. नुकतंच ‘ठष्ट’ (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) हे त्यांचं नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलेलं आहे. नाटकाचं नाव चमत्कारिक असलं तरी त्याची फोड मात्र त्यातल्या विषयाकडे स्पष्ट निर्देश करणारी आहे. शिवाय त्यांनीच हे नाटक दिग्दर्शित केलेलं असल्यानं त्यांना जे म्हणायचंय ते आणखीन ठोसपणे प्रयोगात मंचित झालेलं आहे.

वर्किंग वुमेन्स हॉस्टेलमध्ये रूम नं. ३०२ मध्ये राहणाऱ्या मुलींची लग्नं काही ना काही कारणानं मोडलेली असतात. त्यामुळे या मुलींची आयुष्यं त्यापायी एकतर उदास, नीरस तरी झाली आहेत, किंवा त्या नको इतक्या बंडखोर तरी झाल्या आहेत. पैकी सुलभा पाटील ही पश्चिम महाराष्ट्रातून परिस्थितीवश मुंबईत येऊन नोकरी करणारी तरुणी. लग्न, मुलंबाळं, संसाराची स्वप्नं पाहणारी सरळ-साधी मुलगी. तिचं लग्न न जमण्याची कारणं : सावत्र आईनं त्यात खोडा घालणं.. तसंच धाकटय़ा बहिणींची जबाबदारी लग्नानंतरही आपण घेणार, हा तिचा हट्टाग्रह पचनी न पडल्यानं मुलांनी तिला नकार देणं! बरं, स्वत:च लग्न जमवण्याइतकी ती चंटही नाही. त्यामुळे इच्छा असूनही तिचं लग्न जमत नाहीए.

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

अनामिका ही स्त्रीमुक्तीवादी, स्वतंत्र विचारांची मुलगी. तिचे आचार-विचार झेपणं अशक्य असल्यानं बहुतेक लग्नाळू मुलं तिच्यापासून चार हात दूर राहणंच पसंत करतात. ती मात्र आपल्या शर्तीवर मजेत आयुष्य जगतेय. रूम नं. ३०२ मध्ये राहायला आलेल्यांचं स्त्री-पुरुष संबंध, लग्नसंस्था वगैरेबाबत ब्रेन वॉशिंग करण्याचं काम ती करते. परिणामी सुलभासारख्या परंपरानिष्ठ मुलीलाही तिची काही मतं पटू लागतात.

 

अक्षता ही चॅनलची ईपी असलेली आणखीन एक मुक्त तरुणी. तिनंही आई-वडिलांच्या इच्छेखातर दाखवून वगैरे लग्न जमवण्याचा उद्योग करून पाहिलाय. पण तिच्या आयुष्य जगण्यासंदर्भातल्या बिनधास्त कल्पनांमुळे तिचंही लग्न जमलेलं नाही. शारीर गरज भागवण्यासाठी पुरुषाला जितपत जवळ करायचं तेवढं ती करतेही; पण त्यातही आपल्या गरजेला प्राधान्य! तिलासुद्धा लग्नात रस नाही. तिच्यासाठी आहे हे छान चाललंय.

या तिघींत नोकरीनिमित्तानं प्रीती नावाची आणखीन एक मुलगी त्यांच्या रूममध्ये राहायला येते. तिचा प्रेमविवाह ठरलाय. लवकरच लग्नाचा बार उडवायचंही नक्की झालंय. लग्नापूर्वी काही दिवस बॉयफ्रेंडसोबत मनमुक्त जगता यावं म्हणून तिनं हॉस्टेलमध्ये राहणं पत्करलंय. पण रूम नं. ३०२ मध्ये राहायला आल्यावर काही दिवसांतच प्रीतीचे तिच्या बॉयफ्रेंडबरोबर खटके उडू लागतात. इतके, की अखेर त्यांचं लग्न मोडतं. अनामिका व अक्षताच्या नादी लागल्यानं तसंच या अपशकुनी रूममध्ये राहिल्यामुळेच तिचं ठरलेलं लग्न मोडलं, असं सुपरिटेंडंट शिंदेबाई व हॉस्टेली सफाई कर्मचारी कावेरी तिला सांगतात.

याचदरम्यान सुलभाच्या वयात येऊ घातलेल्या दोघी बहिणी सावत्रआईनं त्यांचं लग्न लावून देण्याचा धोशा मागे लावल्यानं आणि बापानं तिचं ऐकून एकीचं लग्न एका म्हाताऱ्याशी जुळवल्यानं नैराश्याच्या भरात दोघीही आत्महत्या करतात. हा धक्का सहन न झाल्यानं वेडीपिशी झालेली सुलभा रागाच्या तिरमिरीत सावत्रआई, बाप आणि लहानग्या सावत्रभावाचा खून करते आणि आपलंही आयुष्य संपवते..

लेखक-दिग्दर्शक संजय पवार यांनी ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट सांगताना त्यांच्याकडे दयाद्र्र वा सहानुभूत दृष्टीनं पाहण्याचं कटाक्षानं टाळलंय. शक्य तितक्या तटस्थतेनं वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न त्यांनी नाटकात केला आहे. यातल्या चौघींपैकी अनामिका व अक्षता यांची लग्नं त्यांच्या स्त्रीवादी मतांमुळे मोडलीत. तर सुलभाचं लग्न प्राप्त परिस्थितीमुळे होऊ शकलेलं नाही. प्रीतीला स्वत्वाची जाणीव झाल्याने तिनं आपलं ठरलेलं लग्न मोडलंय. ठरलेलं लग्न मोडल्यावर त्या मुलीला कोणत्या भयावह मानसिक, भावनिक आणि सामाजिक अवस्थेतून जावं लागतं, हे या नाटकात कुठल्याच मुलीच्या बाबतीत आलेलं नाही.

सुलभाच्या बाबतीतही ‘ती रात्री थंड पाण्यानं अंघोळ करते..’ या पुसट उल्लेखाव्यतिरिक्त तिचीही तगमग नाटकात कुठंच येत नाही. तिचं मूकपणे सोसणं शेवटच्या तिच्या आकांतात मुखर होतं. परंतु एरव्हीचा तिचा कोंडमारा, घुसमट नाटकात कुठंही येऊ नये, हे चांगलंच खटकतं. अनामिक व अक्षताच्या बाबतीत बोलायचं तर लेखकाचीच मतं त्या व्यक्त करताहेत असं वाटत राहतं. खरं तर लग्न, स्त्री-पुरुष संबंध आदींबाबत आधुनिक विचार बाळगणाऱ्या मुलींच्या आयुष्यातही काही दुखऱ्या जागा असू शकतात. आपल्या आग्रही मतांची किंमत चुकवताना त्याही कधीतरी घायाळ होत असणार.. झाल्या असणार. पण हे चुकूनही नाटकात येत नाही. तसं होतं तर नाटकाला अधिक खोली प्राप्त झाली असती. प्रीतीच्या बाबतीतही हळूहळू होत गेलेलं तिचं मतपरिवर्तन आणि त्यातून लग्न मोडण्यापर्यंतचा तिचा प्रवास दाखवायला हवा होता. पण तसंही घडलेलं नाही. त्यामुळे ही पात्रं लेखकाच्या हातातली बाहुली झाल्यासारखी वाटतात. त्यांच्या संदर्भातील घटना स्वाभाविकपणे घडत नाही. (अपवाद : सुलभाचा!) लेखकानं लग्नांसंबंधीचे आपले विचार मांडण्याकरता नाटक लिहिल्यानं असं घडलं असावं.

अनामिका-अक्षतासारख्या मुक्तपणे आयुष्य जगू इच्छिणाऱ्या मुलींची संख्या आज वाढते आहे. अशांच्या मानसिकतेचा व जगण्याचा सखोल वेध घेणं गरजेचं होतं. दारू पिणं आणि सिगारेट ओढणं म्हणजे आधुनिकता हाही एक चुकीचा समज आहे. आधुनिक स्त्री दाखवण्यासाठी या गोष्टींची खरंच गरज आहे का? की पुरुष या गोष्टी करत असतील तर आम्हीही त्या करू शकतो, हे दाखविण्याचा अट्टहास यात आहे? विचारांच्या प्रगल्भतेला असल्या दाखवेगिरीची बिलकूल गरज नसते, हे संजय पवार स्वत:ही मान्य करतील. त्यांना ‘तथाकथित’ आधुनिक मुलीच दाखवायच्या असत्या तर गोष्ट वेगळी होती. पण इथं तसं नाहीए. त्यांना खरोखरीच आधुनिक विचारांच्या मुलीच अभिप्रेत आहेत. (अक्षताच्या बाबतीत मात्र ही ‘तथाकथित’तेची शक्यता नाकारता येत नाही.) तरीही त्यांच्या हातून ही गल्लत कशी झाली, कुणास ठाऊक! दुसऱ्या एखाद्या दिग्दर्शकानं संहितेतल्या या व अशा काही त्रुटी व उणिवा संजय पवार यांच्या निश्चितपणे लक्षात आणून दिल्या असत्या व त्या दुरूस्त करणंही शक्य होतं. चर्चानाटय़ आणि घटनानाटय़ यांच्या संमिश्रणातून नाटक आकारास येत असल्यानं ही गडबड झाली असावी. यातील सुलभा, कावेरी आणि शिंदेबाई ही पात्रं अस्सल उतरली आहेत. त्यातही सुलभा विशेषत्वानं मनात घर करते.

प्रदीप मुळ्ये यांनी केलेलं वुमेन्स हॉस्टेलचं नेपथ्य अत्यंत वास्तवदर्शी आहे. हॉस्टेलच्या खोल्यांची रचना, भिंतींचा उदासवाणा, फिका रंग, कॉमन गॅलरी या गोष्टी त्यांनी तपशिलांत दाखवल्या आहेत. पात्रांच्या अंतरंगातले आणि बाह्य़ ताणतणाव त्यांनी प्रकाशयोजनेतून अधोरेखित केले आहेत. मिलिंद जोशी यांनी नाटकाची प्रकृती ओळखून आवश्यक तेवढीच पाश्र्वसंगीताची जोड दिली आहे. पौर्णिमा ओक (वेशभूषा) व अशोक राऊत (रंगभूषा) यांनी पात्रांना ‘व्यक्तिमत्त्व’ दिलं आहे.  

हेमांगी कवी या मोठय़ा गुणवत्तेच्या अभिनेत्रीनं सुलभाची मानसिकता अचूक हेरली आहे. त्यांनी पकडलेला भाषेचा लहेजाही लाजवाब. सुलभाचं अवघं व्यक्तिमत्त्व त्यांना गवसलं आहे. बहिणींच्या आत्महत्येनंतरचा सुलभाचा सर्वस्व गमावल्याचा आकांत, त्या वेडय़ापिशा अवस्थेत सावत्रआई, सावत्रभाऊ आणि बापाचा केलेला खून आणि नंतर त्या घटनेच्या भीषणतेची जाणीव होऊन प्रचंड हादरणं.. हे सारं त्यांनी इतक्या उत्कटतेनं व्यक्त केलंय, की त्याचं समर्पक वर्णन करणं अशक्य! रेश्मा रामचंद्र यांनी स्त्रीमुक्तीवादी विचारांची अनामिका तिच्या बंडखोर उद्रेकांनिशी उत्तम साकारली आहे.

लग्न, स्त्री-पुरुष संबंधांबाबतची तिची धारदार मतं, सकळ स्त्रीजातीला जागरूक करण्याची तिची तळमळ, त्यात अपयश आल्यास निराश होणं, रूढीवादी स्त्रियांवरचा रोष हे सगळं त्यांनी इम्पल्सिव्हनेसमधून प्रत्ययकारी केलं आहे. अक्षया िभगार्डेनी आपलं सुख आपल्या शर्तीवर प्राप्त करत मजेत आयुष्य जगण्याचं अक्षताचं तत्त्वज्ञान छान मांडलं आहे. परंपरेनं मिळालेले संस्कार सांभाळायचे की नव्यानं स्वीकारलेल्या विचारांची बांधिलकी, या द्वंद्वात सापडलेली प्रीती- सुपर्णा श्याम यांनी त्यातल्या दुविधेसह यथार्थपणे वठवली आहे. आशा ज्ञातेंनी शिंदेबाई आणि कावेरी झालेल्या पूजा गायकवाड यांनी रूढीवादी स्त्रिया चपखल उभ्या केल्या आहेत. 

स्त्रीवादी विचारांशी बांधिलकी सांगणारं, परंतु जगण्यातली गुंतागुंत व व्यामिश्रता नजरेआड करणारं ‘ठष्ट’ त्यातल्या विचारांकरता तरी बघावंच.