मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्यात तीस वर्षांपासून औद्योगिक विकासाची गंगा वाहत असून या विकासात येथील नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आवश्यक असलेले सांस्कृतिक कार्यक्रम तसेच करमणुकीचे साधन असलेले सिनेमा वा नाटय़गृह उपलब्ध नाही. तीन दशकांपासून सांस्कृतिक व करमणुकीपासून उपेक्षित असलेल्या उरणकरांसाठी येत्या दोन वर्षांत उरणमध्ये सुसज्ज असे नाटय़गृह उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती नगरपालिकेकडून देण्यात आली आहे. त्याकरिता १२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

उरण शहरात १९८४ पासून एकही सिनेमा अथवा नाटय़गृह नाही. उरण तालुक्यात तीस वर्षांपूर्वी ‘उषा’ नावाचे सिनेमागृह होते. त्या ठिकाणी इमारत झाल्यापासून उरणमध्ये सिनेमागृह नाही. तर १९९४ मध्ये मोरा येथे एक सिनेमागृह बांधण्यात आले होते. मात्र, ते अल्पावधीतच बंद पडले. त्यामुळे उरणमधील नागरिकांना सिनेमा पाहण्यासाठी नवी मुंबई, मुंबई तसेच पनवेल गाठावे लागत आहे.
सध्या दोन लाख लोकसंख्या असलेल्या व व्यवसायानिमित्ताने येणाऱ्या लाखभर लोकांच्या करमणुकीसाठी एकतरी सिनेमागृह किंवा नाटय़गृह उरणमध्ये व्हावे, अशी मागणी रसिकांकडून केली जात आहे. या संदर्भात उरण नगरपालिकेचे नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता राजीव गांधी टाऊन हॉलच्या जागेवरच भव्य असे नाटय़गृह उभारण्याचा प्रस्ताव नगरपालिकेने शासनाकडे पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर दोन वर्षांत उरणमध्ये नाटय़गृह उभे राहील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच भविष्यात द्रोणागिरी नोडमध्ये सिनेमागृह व सिडकोच्या माध्यमातून सांस्कृतिक भवनाची उभारणी करण्यात यावी याकरिता आपण प्रयत्न करणार असल्याचे उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी सांगितले आहे.

टाऊन हॉलच्या जागेत नाटय़गृह
१९९६ साली उरण नगरपालिकेने उरण शहरात राजीव गांधी टाऊन हॉलची उभारणी केली होती. या हॉलमध्ये सुरुवातीला अनेक नाटके, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. त्यामुळे उरणमधील नागरिकांना त्याचा आस्वाद घेता येत होता. ९५०च्या आसपास आसन व्यवस्था असलेल्या या सभागृहाची दूरवस्था झाली आहे. धोकादायक ठरलेल्या या सभागृहात कार्यक्रम आयोजित करणे शक्य होत नाहीत त्यामुळे उरणमधील नागरिकांना सध्या सांस्कृतिक कार्यक्रमांपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत उरणमधील ज्येष्ठ नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या राजीव गांधी टाऊन हॉलच्या जागेवरच भव्य असे नाटय़गृह उभारण्याचा प्रस्ताव नगरपालिकेने तयार केला आहे.