नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबवण्यास घेतली आहे. या मोहिमेत मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ५७ वाहनचालकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई परिसरात मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमध्ये वाढ झाली आहे. मद्यधुंदीत वाहन चालविल्यामुळे अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघात होत आहेत. पामबीच मार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास अशाच एका अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता व एक महिला गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर खडबडून जागे होऊन नवी मुंबई वाहतूक विभागाने रविवारी सायंकाळी नवी मुंबईतील विविध ठिकाणी ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हची विशेष मोहीम राबवली. ही मोहीम वाशी, एपीएमसी, कोपरखरणे, रबाले, महापे, तुभ्रे, सीवूड, खारघर, पनवेल, उरण आदी भागांत राबवण्यात आली. या मोहिमेत वाहतूक पोलिसांनी ५७ वाहनचालक मद्य पिऊन वाहन चालवत असल्याचे आढळून आले. त्याच्यावर पोलिसांनी मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याने वाहनचालकांनी मद्यसेवन न करता सुरक्षितपणे वाहन चालवावे तसेच वाहतूक नियमांचे पालन करून नवी मुंबई वाहतूक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे उपआयुक्त अरविंद साळवे यांनी केले.

प्राचार्याला अटक
रविवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास इंदिरा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील चव्हाण हे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत वाशी मार्गावरून आपल्या इच्छित स्थळी जात होते. त्याच वेळी ख्रिश्चन धर्मीयांच्या वतीने पाम बीच मार्गाने बेलापूर ते वाशीदरम्यान लिजन ऑफ मेरी ही पदयात्रा काढण्यात आली होती. पदयात्रा मोराज सर्कलमध्ये पोहोचली असता तेथे सुनील चव्हाण यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्यांचे वाहन पादयात्रेत पाठीमागे असलेल्या रुजवेब मॅथ्यू यांच्या स्कॉर्पिओला धडकून गर्दीत घुसले. वाहनाची धडक इतकी वेगात होती की, पदयात्रेत सहभागी असलेल्या जॉईस कुटिकल व ज्युडो बुत्योला या दोन महिला त्यात गंभीर जखमी झाल्या. त्यांना वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान जॉईस कुटिकल यांचा मृत्यू झाला. ज्युडो बुत्योलो यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तुभ्रे पोलिसांनी सुनील चव्हण यांना अटक केली आहे.