शीव-पनवेल मार्गाच्या खर्चाच्या वसुलीसाठी कामोठे येथे उभारलेल्या टोलनाक्यावर गुरुवारी भांडणाचा शुभारंभ झाला. टोल नाक्यावरील यांत्रिक दंडुका व्यवस्थित पडतो की नाही, याची रंगीत तालीम घेत असताना येथून जाणाऱ्या वाहनचालकाने टोलनाक्याचे व्यवस्थापक राकेश सिंह यांच्या श्रीमुखात भडकवत आपला रोष व्यक्त केला. सिंह यांना व तेथील तीन सुरक्षा रक्षकांना प्रसाद देणारा हा वाहनचालक कोण याचा शोध अद्याप लागू शकला नाही. रंगीत तालीम करतानाची ही परिस्थिती तर प्रत्यक्षात प्रत्यक्ष टोलवसुलीच्या दिवशी काय होईल, असा प्रश्न या टोलनाक्यांना सुरक्षा पुरविणाऱ्या सरकारी व खासगी यंत्रणेला पडला आहे.
टोलनाक्यावरील खारघर व कामोठे हे दोनही टोलनाके वसुलीपूर्वीच राज्यभरात चर्चेत आले आहेत. गुरुवारच्या या घटनेने कामोठे येथील टोलनाक्यातून एक वाहन जात असताना हा दंडुका तेथे आडवा झाला. वाहनामधील व्यक्तीचे व टोलनाक्यावरील व्यवस्थापक सिंह यांच्यात बाचाबाची झाली. या वादाचे पर्यवसान भांडणात झाले. यावेळी संतापलेल्या त्या वाहनचालकाने सिंह यांच्या श्रीमुखात लगावली. या वाहनामध्ये संबंधित व्यक्तीचे कुटुंबीय होते. तेथून जाणाऱ्या इतर मोटारीतील प्रवाशांनीही या भांडणात आपला सक्रिय सहभाग नोंदवून तेथून पसार झाले. या वाहनाचा क्रमांक टोलनाक्याचे व्यवस्थापक यांनी टिपला असल्याची माहिती कळंबोली पोलिसांनी दिली आहे. याबाबत अदखलपात्र गुन्ह्य़ाची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कामोठे व खारघर हे दोन्ही टोलनाके बंद असल्याने या नाक्यांवरचा दंडुका का पाडला जातो, तुम्हाला रंगीत तालीम घ्यायची असल्यास त्यावेळी वाहनांचे जाणे बंद करून रंगीत तालीम घ्या, असे येथील वाहनचालकांचे म्हणणे आहे.
पनवेलकरांना टोल सवलत मिळेल का?  
खारघरच्या टोलनाक्यामुळेच प्रशांत ठाकूर यांना आपली आमदारकी ताब्यात ठेवता आली. स्थानिकांना या टोलनाक्यातून सवलत मिळावी यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाला तिलांजली देऊन भाजपमधून ते पनवेलचे प्रश्न सोडवत आहेत. भाजपची सत्ता असताना तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्याकडून पनवेलच्या वाहनचालकांना या टोलनाक्यातून सवलत मिळेल का, असा प्रश्न तालुक्यातील वाहनचालकांना पडला आहे.