शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या संख्येत ग्रामीण भागात लक्षणीय घट निर्माण झाल्यामुळे मजुरांसाठी शेतक ऱ्यांची भटकंती सुरू झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतीच्या मशागतीची वेळ आहे. उन्हाळ्यात नांगरणी, वखरणी करून शेतातील केरकचरा जाळून शेत तयार करावे लागत असते. शेतकरी शेतकामासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी मजुरांसाठी भटकंती करत असल्याचे चित्र ग्रामीण भागातील विविध  तालुक्यात दिसून येत आहे.
शेतीच्या मशागतीची कामे मजुरांअभावी ट्रॅक्टरने होतात. बैलांच्या वाढलेल्या किमती आणि मजुरीचे दर याचा हिशेब केला तर ते परवडणारे नसल्याने शेती व्यवसायावर परिणाम होत आहे. शेतक ऱ्यांनी मजूर मिळत नसल्याने ट्रॅक्टरने मशागत व पेरणी करणे पसंत केले आहे. मजूर मिळत नाही व मजुरांचे दर वाढल्याने दिवसाकाठी पुरुष मजुरांना १५० ते २०० रुपये आणि महिला मजुरांना १०० ते १२५ रुपये द्यावे लागते. मजुरांच्या इच्छेनुसार काम करण्याच्या वेळा असतात. कळमेश्वर, काटोल, रामटेक, कुही मांढळ या परिसरात औद्योगिक वसाहत असल्यामळे तेथील कारखान्यात दिवसाकाठी कामासाठी १०० रुपये मिळत असले तरी तेथे काम करण्यास मजूर तयार असतात. उन्हाच्या झळा सहन करून शेतात कामे करावी लगत असल्याने मजूर कामासाठी तयार होत नाही. त्यामुळे  मोजकेच शेतात काम करणारे असतात. गुरांचा चारा, शेण गोळा करण्यासारखी कामे शेतकरी याला करावी लागतात. शेतीची महागडी बी-बियाणे खरेदी केल्यानंतर पेरणी करून जर पावसाने दगा दिल्यास किंवा वातावरणातील बदलामुळे अवकाळी पावसाने शेतक ऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दाम मिळत नाही. शेतकामासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी आपाल्या कुटुंबातील महिला व मुलाला शाळेच्या सुटय़ा लागल्याने त्यांच्याकडूनच ही कामे करून घेतो. एकूणच शेती हा व्यवसाय न परवडणारा झाला आहे.