प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या नाशिकला पुन्हा हवाई नकाशावर आणण्याच्या मुहुर्तावर सोमवारी मुंबईतील पावसाने पाणी फिरविले. मुसळधार पावसामुळे छोटेखानी विमान मुंबईहून नाशिकला येऊच शकले नाही. परिणामी, नाशिक-पुणे विमान सेवेचे उद्घाटन पुढे ढकलणे भाग पडले. पहिल्याच दिवशी घडलेल्या या प्रकाराने प्रवासोत्सुक प्रवाशांचा हिरमोड झाला. या विमानसेवेचे उद्घाटन आता पुढील दोन ते तीन दिवसात होणार असून त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या नाशिकला हवाई नकाशावर आणण्याचा विषय बहुचर्चित ‘सी प्लेन’ अर्थात जमीन व पाण्यावर उतरू शकणाऱ्या नऊ आसनी छोटेखानी विमानाच्या माध्यमातून सोडविण्यात आला आहे. १५ जूनपासून नाशिक-पुणे या औद्योगिक शहरांदरम्यान या विमानाची नियमित सेवा सुरू होणार असल्याचे मेहेर सव्‍‌र्हिसेसने जाहीर केले होते. त्या अनुषंगाने ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ नाशिकने नोंदणीही सुरू केली. नाशिकहून पुण्याला भरारी घेण्यासाठी खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे व सीमा हिरे यांच्यासह काही प्रवाशांनी आगाऊ नोंदणीही केली होती. सोमवारी सकाळी ९.४० वाजता ओझर विमानतळावरून हे विमान पुण्याच्या दिशेने उड्डाण करणार होते. तथापि, मुंबईतील पावसामुळे ते नाशिकला येऊ शकले नाही. मुंबईत संततधारेमुळे विमानाच्या आतील भागात दवबिंदू सारखे घटक जमा झाले. दिशादर्शन, वेग आदी दर्शविणाऱ्या मीटरवरील काचेच्या पट्टीत धुके जमले. या स्थितीत विमानाचे उड्डाण करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ठरणार नसल्याने सोमवारची फेरी स्थगित केल्याची माहिती मेहेर सव्‍‌र्हिसेसचे प्रमुख सिध्दार्थ वर्मा यांनी दिली. पुढील दोन ते तीन दिवसात नवीन तारीख निश्चित केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
रस्तेमार्गे नाशिक-पुण्याचा अतिशय कंटाळवाणा सहा तासांचा प्रवास हवाई मार्गे अवघ्या तासाभरावर येणार आहे. यामुळे लोकप्रतिनिधींनी त्यास प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला. प्रवाशांनी या फेरीसाठी प्रती ५९९९ रुपये मोजले. या विमान सेवेला कार्यान्वित करण्यासाठी तानच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. सोमवारपासून नियमित सेवा सुरू होणार असल्याने आदल्या दिवशी छोटेखानी विमान ओझरच्या विमानतळावर आणावे, असा तानचा आग्रह होता. तथापि, मेहेरने तसे नियोजन न केल्यामुळे पहिल्याच दिवशी ही स्थिती उद्भवल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. या विमान सेवेच्या निमित्ताने ओझरच्या विमानतळाचा वापर सुरू होणार आहे. पुण्याला विमानाने जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्या प्रवाशांचे पुढील काही कार्यक्रम निश्चित असतील. अशावेळी अचानक फेरी रद्द झाल्यास प्रवाशांची अडचण होईल. अशी अनिश्चितता राहिल्यास या सेवेवर प्रवाशांचा विश्वास राहणार नसल्याचे काहींनी सांगितले.